रशियात विमान कोसळून 15 ठार
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियातील एक कार्गो विमान मंगळवारी दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्व 15 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. इंजिनात आग लागल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने देखील या दुर्घटनेची पुष्टी दिली आहे. हे विमान इवानोवो भागात कोसळले आहे.
रशियात मंगळवारी कोसळलेले विमान हे आयएल-76 प्रकारातील होते. उ•ाणाच्या काही वेळातच या विमानाच्या इंजिनला आग लागली होती. यानंतर हे विमान वेगाने जमिनीच्या दिशेने आले आणि कोसळले. कार्गो विमानात चालक दलाचे 8 सदस्य तर 7 प्रवासी होते. हे सर्वजण या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले आहेत. इवानोवो भागापासून युक्रेनची सीमा सुमारे 700 किलोमीटर अंतरावर आहे.
रशियात यापूर्वी जानेवारीमध्ये विमान कोसळले होते. त्या दुर्घटनेत 74 जण मारले गेले होते. मृतांमध्ये प्रामुख्याने युक्रेनी कैद्यांचा समावेश होता.