राज्यात 15 कफ सिरप सुरक्षित
आरोग्य खात्याची माहिती : उर्वरित नमुन्यांचा अहवाल येणे बाकी
बेंगळूर : मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये निकृष्ट दर्जाच्या कफ सिरपमुळे 15 हून अधिक बालकांचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आरोग्य खात्याने राज्यातील कफ सिरपचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले होते. आता आरोग्य खात्याने प्रयोगशाळेकडून आलेल्या अहवालाच्या आधारे माहिती दिली आहे. राज्यात वापरले जाणारे 15 कफ सिरप सुरक्षित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून उपलब्ध झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. सुमारे 350 कफ सिरपचे नमुने जमा करण्यात आले आहेत. त्यापैकी 15 सुरक्षित असल्याची पुष्टी झाली आहे. उर्वरित सिरपच्या नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये कफ सिरपमुळे घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ते तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. एका सिरपची पूर्णपणे चाचणी करण्यासाठी किमान 7 दिवस लागतात, अशी माहितीही आरोग्य खात्याने दिली आहे. उर्वरित अहवाल प्राप्त झाल्यानंतर निकृष्ट दर्जाचे सिरप आढळल्यास संबंधित कंपनीविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. पुढील आठवड्यात आरोग्य खात्याला सर्व नमुन्यांचे अहवाल उपलब्ध होण्याची शक्यता आहे.