जिल्ह्यात 147 निवारा केंद्रांची निवड
पशुसंगोपन खात्याकडून उपाययोजना : पूरस्थितीसाठी अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याच्या सूचना, तालुका प्रशासनाच्या सहकार्याने तयारी
बेळगाव : जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून जनजीवन विस्कळीत होत आहे. यातच अनेक तालुक्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून नदीकाठावरील नागरिकांना स्थलांतर होण्याचा धोका आहे. नागरिकांना आपल्या जनावरांसह मूलभूत साहित्य घेऊन स्थलांतर व्हावे लागणार आहे. दरम्यान, पशुसंगोपन खात्याकडूनही उपाययोजन हाती घेण्यात येत आहेत. जिल्ह्यातील 15 तालुक्यांतील 203 गावांवर अधिक परिणाम होतो. त्यानुसार 2 लाख 449 जनावरे पूरस्थितीमुळे बाधित होतात. यासाठी 147 निवारा केंद्रांची निवड करण्यात आली असून 44 हजार जनावरांना त्याठिकाणी स्थलांतरित करता येणार आहे. तालुका प्रशासनाच्या सहकार्याने ही तयारी करण्यात आली आहे. खात्याकडून अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात खात्याकडून 12 लाख 39 हजार जनावरांना लाळ्याखुरकत लसीकरण करण्यात आले असून 4 लाख 37 हजार जनावरांना लम्पी लसीकरण करण्यात आले आहे. जनावरांचे योग्यरित्या संगोपन व्हावे, त्यांना कोणत्याही प्रकारची समस्या होणार नाही यादृष्टीने जिल्हा पशुसंगोपन खात्याकडून उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात शेळ्या-मेढ्यांना ईटी लसीकरण करण्यासाठी 14 लाख 65 हजार लसींचा संग्रह करण्यात आला असून नुकताच लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला आहे. लसीकरण लवकरात लवकर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने नजीकच्या पशुसंगोपन खात्याच्या पशुवैद्याधिकाऱ्यांकडून लसीकरण करण्यात येणार आहे.
अथणी व्याप्तीत बीक्यूचे 10 लसीकरण
जनावरांसाठी मे महिन्यात बीक्यू लसीकरणही करण्यात आले आहे. यामुळे जनावरांचे रोगापासून रक्षण होणार आहे. दरम्यान, अथणी तालुक्यातील कोकटनूर येथील जनावरे बीक्यूने बाधित होतात. यामुळे अथणीच्या पशूसंगोपन खात्याच्या व्याप्तीत 10 हजार लसीकरण करण्यात आले आहे. सदर रोगाचा संसर्ग होऊ नये, यासाठी जिल्हास्तरावरून पावले उचलण्यात येत असून तालुकानिहाय लसीकरणाला गती देण्यात येत आहे.
12 लाखांवर लाळ्याखुरकत तर 4 लाखांवर लंपी लसीकरण
जनावरे लाळ्याखुरकत व लंपी रोगामुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित होतात. पण खात्याकडून वेळीच लसीकरण मोहीम हाती घेतल्याने जनावरांची लाळ्याखुरकत व लंपी पासून बचाव होणार आहे. खात्याकडून 12 लाख 39 हजार जनावरांना लाळ्याखुरकत लसीकरण करण्यात आले असून 4 लाख 37 हजार जनावरांना लंपी लसीकरण करण्यात आले आहे. तसेच खात्याने एचएस लसीकरणासाठी 50 हजार लस संग्रहित केल्या असून याचेही लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात जनावरांसाठी 147 निवारा केंद्रांची निवड
जिल्ह्यात अतिवृष्टीसदृश पाऊस होत आहे. यामुळे नदीकाठावरील नागरिकांसह जनावरांना याचा परिणाम होणार आहे. यासाठी पशुसंगोपन खात्याने या स्थितीचा सामना करण्यासाठी सज्जता ठेवली असून उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. यासाठी 206 जणांना प्रशिक्षण देण्यात आले असून प्रत्येक सर्कलसाठी 35 पथकांची नेमणूक केली आहे. जनावरांसाठी 147 निवारा केंद्रांची निवड करण्यात आली असून 44 हजार जनावरांना त्याठिकाणी स्थलांतरित करता येणार आहे. प्रत्येक जनावराला 6 किलो चारा याप्रमाणे 265 टन चारा संग्रहित करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने हे काम हाती घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांकडूनच सरकारी दारानुसार चारा खरेदी होणार आहे. तालुका प्रशासनातर्फे सर्व कामे करण्यात येणार आहेत.
खात्याकडून आधीच पूर्वतयारी
जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे नदीकाठाला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांसह जनावरेही प्रभावित होणार असून खात्याकडून परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पूर्व तयारी करण्यात आली आहे. जनावरांसाठी निवारा केंद्रांची निवड करण्यात आली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांचीही प्रशिक्षण देऊन नियुक्ती करण्यात येणार आहे. जिल्ह्यात लसीकरण गतीने सुरू असून जनावरांना कोणत्याही प्रकारचा रोगसंसर्ग होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येत आहे, असे पशुसंगोपन खात्याचे उपसंचालक डॉ. रवी सालीगौडर यांनी सांगितले.
-पशुसंगोपन खात्याचे उपसंचालक डॉ. रवी सालीगौडर
