अमेरिकेत पूरामुळे 14 जणांचा मृत्यू
सहा राज्यांना मोठा फटका : काही लोक बेपत्ता
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेतील केंटकी, जॉर्जिया, व्हर्जिनिया, वेस्ट व्हर्जिनिया, टेनेसी आणि इंडियाना या राज्यांना सध्या पुराचा मोठा फटका बसला आहेत. सर्वात जास्त प्रभावित राज्य केंटकी हे असून तेथे 12 लोकांचा मृत्यू झाला, तर पश्चिम व्हर्जिनिया आणि जॉर्जियामध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. बुधवारपर्यंत एकूण 16 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. केंटकीमध्ये पाण्याची पातळी आणखी वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसात केंटकीच्या काही भागात 6 इंचांपर्यंत (15 सेंमी) पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसामुळे नद्यांची पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्यामुळे वाहने पाण्यात अडकली. सतत वाढणाऱ्या पाण्याच्या पातळीमुळे अनेक लोक बेपत्ता आहेत. बचाव पथकाने केंटकी आणि आसपासच्या भागात 1,000 हून अधिक बचाव पथके नेमली आहेत, असे वेस्ट व्हर्जिनियाचे गव्हर्नर पॅट्रिक मॉरिसी म्हणाले. राष्ट्रीय हवामान सेवेने केंटकी राज्यासाठी इशारा जारी केला आहे. पुढील काही दिवसांत राज्यातील अनेक भागात नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढू शकते. अमेरिकेतील या पुरामागील मुख्य कारण ध्रुवीय भोवरा हे बर्फाळ वादळ असल्याचे मानले जाते. गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिकेतील अनेक राज्ये तीव्र थंड वाऱ्यांशी झुंजत आहेत.
ध्रुवीय भोवऱ्यामुळे अमेरिकेच्या पूर्वेकडील राज्यांमधील सुमारे 90 दशलक्ष लोकांना तीव्र थंडीचा सामना करावा लागत आहे. तापमान विक्रमी पातळीवर घसरले असून शाळाही बंद आहेत. 14 हजारांहून अधिक घरांमध्ये वीज खंडित झाली असून 17 हजार ठिकाणी पाणीपुरवठा थांबला आहे.