For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दांडेलीत 500 रुपयांच्या 14 कोटांच्या बनावट नोटा आढळल्या

12:21 PM Apr 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
दांडेलीत 500 रुपयांच्या 14 कोटांच्या बनावट नोटा आढळल्या
Advertisement

कारवार : गांधीनगर, दांडेली येथील एका घरात 500 रुपयांच्या 14 कोटींच्या बनावट नोटा आढळून आल्या आहेत. या नोटांमुळे दांडेलीत मोठी खळबळ माजली आहे. तथापि, या बनावट नोटांचा वापर चलनात आणण्यासाठी करण्यात येणार होता की अन्य कशासाठी (खेळणी) करण्यात येणार होता, याचा तपासाअंती खुलासा होणार आहे. या प्रकरणाबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी, गांधीनगर-दांडेली येथे नूरजहान झुंजवाडकर यांच्या मालकीचे घर आहे. हे घर गोव्यातील अर्सद खान नावाच्या व्यक्तीने भाड्याने घेतले होते. तथापि, गेल्या महिन्यापासून अर्सदचा घरात वावर आढळून आला नव्हता. म्हणून घराची पाहणी केली असता पाठीमागील दरवाजाची कडी न लावण्यात आल्याचे दिसून आले. ही माहिती दांडेली नगर पोलीस ठाण्याला दिली असता पोलिसांनी घराची पाहणी केली. त्यावेळी 500 रुपयांच्या 14 कोटी रुपये आणि नोटा मोजण्यासाठी वापण्यात येणारी मशीन आढळून आली.  नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाऐवजी रिवर्स बँक ऑफ इंडिया असे छापण्यात आले आहे. नोटांवर गव्हर्नरची सही नाही. प्रत्येक नोटेला शून्य क्रमांक देण्यात आला आहे. या नोटांवर ‘मुव्ही शुटींग पर्पज ओनली’ असे लिहिण्यात आलेल्या पेपरवर छापण्यात आल्या आहेत. नोटा ताब्यात घेऊन दांडेली पोलीस अर्सद खान याचा शोध घेत आहेत. पोलीस तपासानंतर या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.