विविध चोरी प्रकरणातील 14.90 लाखाचा मुद्देमाल जप्त
पाच जणांना अटक : कार, रॉयल एनफिल्ड,कॅमेरा, जेसीबीचे सुटे भाग अन् एक सुमो हस्तगत
खानापूर : शहरासह तालुक्यात झालेल्या विविध ठिकाणी झालेल्या चोरी प्रकरणातील चार चोरी प्रकरणांचा छडा खानापूर पोलिसांनी लावला असून यात एक स्वीफ्ट कार, एक रॉयल इनफिल्ड, एक कॅनन कंपनीचा कॅमेरा, जेसीबीचे सुटे भाग आणि चोरीसाठी वापरलेली सुमो जप्त केली आहे. याप्रकरणी सोयब मारीहाळ, सुभानी तोलगी, अतिफ सनदी, अजिज तल्लूर, चौघेही रा. पारिश्वाड, ता. खानापूर तसेच बुलेट चोरी प्रकरणात समीर पाटील, रा. जोयडा या पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून जवळपास 14 लाख 90 हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.
याबाबत खानापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. 2 जुलै रोजी महेश कुंभार यांची रॉयल इनफिल्ड बुलेट (क्र. के. ए. 22-एच. यू-4236) खानापूर येथील गणेश कॉलनी येथील घरासमोरून अज्ञातानी चोरी केली होती. याबाबत खानापूर पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली होती. याप्रकरणी खानापूर पोलिसांनी सखोल तपास करून जोयडा येथील समीर पाटील याच्याकडून बुलेट जप्त करून त्याला अटक करण्यात आली आहे. तर दि. 4 मार्च 2025 रोजी बेळगाव-वडगाव येथील सुनीता लोहार यांची गंगवाळी येथे उभी करण्यात आलेली स्वीफ्ट कार (क्र. के. ए. 22-एम. डी. 8304) ही चोरट्या’नी गंगवाळी येथून चोरी केलेली होती. तसेच इतर प्रकरणात चोरी प्रकरणातील कॅनन कंपनीचा कॅमेरा आणि लेन्स तसेच जेसीबीचे सुटे पार्ट चोरण्यात आले होते.
या सर्व प्रकरणाचा खानापूर पोलिसांनी सखोल तपास करून सोयब मारीहाळ, सुभानी तोलगी, अतिफ सनदी, अजिज तल्लूर, सर्व रा. पारिश्वाड, ता. खानापूर तसेच समीर पाटील, रा. जोयडा याला अटक करून त्याच्याकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली टाटा सुमो असा एकूण 14 लाख 90 हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या सर्व आरोपींना शनिवारी रात्री न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली. या सर्व चोरी प्रकरणाचा तपास बैलहोंगल विभागाचे उपअधीक्षक विरय्या मठपती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला असून खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक लालसाब गंवडी, उपनिरीक्षक एम. बी. बिरादार, निरंजन तसेच जगदीश काद्रोळी, बी. एस. नायक, एस. व्ही. कमकेरी यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. या तपास कार्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.