खनिज लिलावातून मिळाल्या 136 कोटी
जप्त केलेल्या खनिज मालाचा ई-लिलाव पूर्ण : खाण व भूगर्भशास्त्र संचालक नारायण गाड
पणजी : खाण आणि भूगर्भ खात्यातर्फे जप्त करण्यात आलेल्या खनिज मालाची ई-लिलाव प्रक्रिया पार पडली आहे. ई-लिलावात सरकारच्या खाण खात्याला बोलीदार खाण कंपन्यांकडून 118 कोटी 35 लाख 58 हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. याशिवाय त्यावर रॉयल्टी स्वरुपात 17 कोटी 75 लाख 33 हजार 700 रुपये रक्कम सरकारला मिळाली आहे, अशी माहिती खाण आणि भूगर्भशास्त्र खात्याचे संचालक नारायण गाड यांनी दिली.
संचालक नारायण गाड यांनी सांगितले की, राज्यातील विविध 13 ठिकाणी जप्त केलेल्या खनिज मालाचा ई-लिलाव दि. 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी करण्यात आला. या ई-लिलावात बोलिदार कंपन्यांकडून एकूण 136 कोटी 10 लाख 91 हजार 700 रुपयांचा एकूण महसूल प्राप्त झाला आहे. या 13 ठिकाणांपैकी नावेली, धारबांदोडा, मये, शिरगाव, कोडली, वागूस, पाळी, शिरगाव, कोळंब आदी क्षेत्रातील खनिज मालाचा ई-लिलाव करण्यात आला आहे.सरकारने लावलेल्या लिलाव बोली रक्कमेपेक्षा अधिक रक्कम बोलिदारांकडून प्राप्त झाली आहे. एकूण बोलिदारांपैकी पाळी येथील खनिज मालाच्या ई-लिलावातून सेसा रिसोर्स कंपनीकडून सर्वाधिक रक्कम प्राप्त झाल्याचेही गाड यांनी सांगितले.