For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

विषारी औषध प्राशनाने वर्षात 135 जणांचा मृत्यू; कीटकनाशकांमध्ये सर्वाधिक ‘ग्रामोझान’चा वापर

01:55 PM Mar 02, 2024 IST | Abhijeet Khandekar
विषारी औषध प्राशनाने वर्षात 135 जणांचा मृत्यू  कीटकनाशकांमध्ये सर्वाधिक ‘ग्रामोझान’चा वापर
pesticides Gramozan

आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तरुणाईचे प्रमाण अधिक

बाळासाहेब उबाळे कोल्हापूर

जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तरुण-तरुणींची संख्या अधिक आहे. आत्महत्येसाठी किटकनाशकाचा वापर अधिक होत असल्याचे सीपीआर पोलीस चौकीत दाखल नोंदींवरुन निदर्शनास येते. त्यामध्येही ‘ग्रामोझोन’ कीटकनाशकाचा वापर अधिक झाला आहे. गतवर्षात कीटकनाशक प्राशन केलेल्या 1375 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 135 जणांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

पंधरा दिवसापूर्वी तरुणाने घरगुती वादातून ग्रामोझोन प्राशन केले. दुसऱ्या दिवशी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कुटुंबातील कर्ता मुलगा गेल्याने पालकांवर मोठा आघात झाला. त्याच दिवशी रंकाळा येथील बागेमध्ये एकाने कीटकनाशक प्राशन करुन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. कीटकनाशक, विशेषत: ग्रामोझोन घेतलेले रुग्ण सीपीआरमध्ये आठवड्यातून 3 ते 4 येतात. औषधाचे प्रमाण कमी असेल आणि वेळेत उपचार मिळाले तर त्यांचे प्राण वाचतात. विषारी औषध प्राशन केलेल्या सीपीआरमध्ये दाखल रुग्णापैकी दोन रुग्ण दगावत असल्याची येथील आकडेवारी दर्शवते. 2023 मध्ये सीपीआरमध्ये विषारी औषध प्राशन केलेल्या 1375 रुग्णांची नोंद झाली, त्यातील 135 जणांचा मृत्यू झाला आहे.

क्षुल्लक कारणांवरुन मृत्यूला कवटाळले जाते.
आत्महत्येची कारणे आणि मार्ग वेगवेगळे असू शकतात. गळफास, नदी-विहिरीत उडी, विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्या जात आहेत. यामध्ये कीटकनाशकाचा वापर अधिक आहे. घरातील किरकोळ वाद, कुटुंबातील कलह, प्रेमभंग अशी आत्महत्येची क्षुल्लक कारणे दाखल प्रकरणात आढळतात.

Advertisement

सहज उपलब्ध होणारे ग्रामोझोन
ग्रामोझोन कीटकनाशक शेती उत्पादनांची विक्री करणाऱ्या दुकानात सहज उपलब्ध होते. त्यामुळे याचा पिकाशिवाय आत्महत्येसाठीही वापर होतो आहे. सीपीआरमध्ये आठवड्यात तीन रुग्ण ग्रामोझोनचे दाखल होतात. त्याचा थेट परिणाम किडनीवर होतो.

Advertisement

डायलेसिसचा खर्च लाखांत
शरीरात भिनलेले विष बाहेर काढायचे असेल तर डायलेसिस करावे लागते. यासाठीचे अत्याधुनिक डायलेसीस मशिन सीपीआरमध्ये उपलब्ध नाही. शहरातील काही ठराविक रुग्णांलयामध्ये हे मशीन आहे. त्या रुग्णालयातील डायलेसिसचा खर्च लाखात आहे. त्यामुळे सर्वंसामान्य रुग्णावर उपचार करणे अशक्य होते. तरीही रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी कर्ज काढून उपचार केले जातात. त्यातूनही रुग्णाचा जीव वाचला तर ठिक! अन्यथा ते कुटुंब कर्जाच्या विळख्यात अडकते.

2023 मधील विषारी औषध प्राशन केलेली रुग्ण संख्या आणि मृत्यू
एकूण रुग्ण - 1375 : मृत्यू -135

Advertisement
Tags :
×

.