अफगाणिस्तानात 13 वर्षीय मुलाकडून मृत्युदंडाची अंमलबजावणी
शिक्षा पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी
वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तानातून एक विदारक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यात 80 हजार लोकांसमोर एका युवकावर गोळ्या झाडण्यात आल्या. धक्कादायक बाब म्हणजे या शिक्षेची अंमलबजावणी एका 13 वर्षीय मुलाने केली आहे. शिक्षा झालेल्या युवकावर या मुलाच्या परिवाराच्या सदस्यांच्या हत्येचा आरोप होता. तालिबानच्या अधिकाऱ्यांनी आरोपीची ओळख पटविली होती. ज्यानंतर अफगाणिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला दोषी ठरविले होते. यानंतर तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्लाह अखुंदजादाच्या त्याच्या मृत्युदंडाला मंजुरी दिली होती.
मुलाकडून माफीस नकार
दोषी ठरविण्यात आलेल्या युवकाला माफ करू इच्छितो का अशी विचारणा झाली असता 13 वर्षीय मुलाने स्पष्ट नकार दिला. यानंतर अधिकाऱ्यांनी सार्वजनिक स्वरुपात लोकांना मृत्युदंडाची शिक्षा पाहण्यासाठी प्रोत्साहित केले होते. याकरता रितसर नोटीस जारी करण्यात आली आणि त्याला व्यापक स्वरुपात प्रसारित करण्यात आले.
शिक्षा पाहण्यासाठी हजारो लोक
सार्वजनिक मृत्युदंड पाहण्यासाठी स्टेडियममध्ये सुमारे 80 हजार लोकांनी गर्दी केली होती. ज्यानंतर तालिबानी अधिकाऱ्यांनी 13 वर्षीय मुलाच्या हातात बंदूक देत गोळी झाडण्याचा निर्देश दिला. काही क्षणातच या मुलाने गोळ्या झाडून आरोपीचा जीव घेतला. या आरोपीचे नाव मंगल होते आणि त्याला अब्दुल रहमानची हत्या करण्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते.