'टॉप' चे 13 हजार थकबाकीदार पाणी कनेक्शन रडारवर
कोल्हापूर / विनोद सावंत :
टॉपचे थकबाकी असणारे 13 हजार पाणी कनेक्शनधारक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या रडारवर आहेत. या सर्व कनेक्शनधारकांना जप्ती पूर्व नोटीस बजावली आहे. तसेच 100 टक्के थकबाकी वसुल होण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने पथक नियुक्त केले आहे.
महापालिका पाटबंधारे विभागाकडून पाणी खरेदी करून प्रक्रिया करून शहरात वितरित करते. त्यामुळे वास्तविक नागरिकांनी पाणीपट्टी वेळच्यावेळी जमा करणे अपेक्षित आहे. परंतू तसे होत नाही. एकीकडे लाईटचे बील एक महिन्याचे वेळेवर जमा केले नाही तर महावितरण कंपनी कनेक्शन बंद करते. यावेळी तत्परतेने नागरिक बील जमा करतात. हीच तत्परता महापालिकेचे पाणीपुरवठाधारक दाखवत नाही. मुळातच दोन महिन्याचे पाण्याचे बील असते. तेही कनेक्शनधारक जमा करत नाहीत. सुमारे 30 कोटी थकबाकी आहे. तसेच चालु वर्षातीलही बील आहेत. थकबाकीसह चालु बील 100 टक्के वसुल करण्याचे टार्गेट पाणीपुरवठा विभागाला दिले आहे.
प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी विविध विभागातील वसुली अपेक्षित झाली नसल्याने बैठक घेतली. यामध्ये पाणीपुरवठा विभागाचे टार्गेटच्या तुलनेत अपेक्षित वसुली झालेली नाही. यावर प्रशासकांनी पाणीपुरवठा विभागावर खर्च जास्त होत असून त्या प्रमाणात वसुली होत नसल्याने खंत व्यक्त केली. तसेच सर्व विभागानी दिलेले टार्गेट पूर्ण करावे अन्यथा संबंधित विभाग प्रमुखांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. यानंतर पाणीपुरवठा विभाग अॅक्शनमोडवर आला असून 10 हजारवर थकबाकी असणाऱ्या तब्बल 13 हजार पाणी कनेक्शनधारकांना नोटीस बजावली आहे. तसेच वसुलीसाठी पथकही नियुक्त केले आहे.
सर्वच स्टाप वसुलीसाठी रस्त्यावर
पाणीपुरवठा विभागाकडे एकूण 50 कर्मचारी आहेत. वसुली 100 टक्के होण्यासाठी हा सर्व स्टाप वसुलीसाठी कार्यालयाबाहेर पडला आहे. सकाळी 10 ते दुपारी 12 असे दोन तास पथकासोबत ते वसुलीसाठी असतात. यानंतर कार्यालयातील कामेही ते करतात.
12 ग्रामपंचायतीची वसुलीची संधी
शहरालगतच्या 12 ग्रामपंचायतीची 8 कोटी 58 लाखांची थकबाकी आहे. 1992 पासूनची ही थकबाकी आहे. यामध्ये 2 कोटी मुद्दल असून उर्वरीत दंड आहे. सध्या महापालिकेचे प्रशासक जिल्हा परिषदेचे सीईओ कार्तिकेयन एस आहेत. त्यामुळे ते ही थकबाकी जमा होण्याची संधी आहे.
पाणीपट्टी तेवढीच, टार्गेटात वाढ
महापालिका प्रशासनाने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी सर्व विभागाना वसुलीचे टार्गेट दिले आहे. मार्च अखेर हे टार्गेट पूर्ण करण्याचे आदेश आहेत. यामध्ये पाणीपुरवठा विभागाला 88 कोटींचे टार्गेट दिले आहे. वास्तविक पाणीपट्टीत या वर्षी कोणतीही वाढ नाही. वर्षाची बीलींग 48 कोटी असते. थकबाकी सुमारे 30 कोटी आहे. असे असताना 88 कोटींचे टार्गेट कसे होणार असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
रेल्वेचे कनेक्शन तोडले
मार्चमध्ये रेल्वे प्रशासनाला 2 कोटी 64 लाखांची थकबाकी असल्याने नोटीस बजावली होती. कनेक्शन तोडण्यासाठी गेल्यानंतर पैसे जमा करणार असल्याचे सांगितले होते. परंतू अद्यपी थकबाकी जमा झाली नसल्याने पाणीपुरवठा विभागाने त्यांचे कनेक्शन तोडले आहे.
तर कनेक्शन तोडण्याची कारवाई
प्रशासनाने वसुलीचे दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने 5 पथकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये शाखा अभियंता, मीटर रिडर, फिटरसह अन्य कर्मचारी आहेत. 13 हजार थकबाकीदारांना नोटीस बजावली असून मुदतीमध्ये थकबाकी जमा केली नाही तर कनेक्शन तोडण्याची कारवाई केली जात आहे.
प्रशांत पंडत, पाणीपट्टी अधीक्षक
एकूण पाणी कनेक्शन- 1 लाख 4 हजार
नोटीस बजावलेले कनेक्शनधारक -13 हजार
वसुलीसाठी एकूण कर्मचारी- 50
वसुलीसाठी पथक -5
एका पथकात कर्मचारी-10