चिक्कबळ्ळापूरनजीक अपघातात 13 जण ठार
मृत मुळचे आंध्रप्रदेशातील : दसरा साजरा करून रोजंदारीसाठी बेंगळूरला येत असताना काळाची झडप
बेंगळूर : चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 वर चित्रावतीनजीक झालेल्या भीषण अपघातात 13 जण ठार झाले. गुरुवारी सकाळी 6:30 वाजता ही घटना घडली. रस्त्याकडेला थांबलेल्या काँक्रीट मिक्सर वाहनाला टाटा सुमोने मागून धडक दिली. दाट धुक्यामुळे सुमो चालकाला समोरील वाहन न दिसल्याने हा अपघात झाला. मृत मुळचे आंध्रप्रदेश येथील असून रोजंदारीसाठी बेंगळूरमधील विविध भागात वास्तव्यास होते. आंध्रप्रदेश नोंदणीची टाटा सुमो बेंगळूरला निघाली होती. त्यात 14 जण प्रवास करत होते. गुरुवारी सकाळी चित्रावतीनजीक महामार्गावर थांबलेल्या काँक्रीट मिक्सर वाहनाला सुमोची धडक बसली. त्यामुळे 12 जणांचा जागीत मृत्यू झाला. तर एकाचा इस्पितळात मृत्यू झाला. दोघा जखमींवर चिक्कबळ्ळापूर जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातग्रस्त सुमोमधील सर्वजण गावी दसरा सण साजरा करून बेंगळूरला रोजंदारीसाठी निघाले होते. त्यावेळी त्यांच्यावर काळाने झडप घातली. अरुणा, नरसिंहमूर्ती, नरसिंहप्पा, हृत्विक, पेरीमळी पवनकुमार, सुब्बम्मा, वेंकटनारायण, शांतम्मा, राजवर्धन, नारायणप्पा, बेल्लाळ वेंकटाद्री, बेल्लाळ लक्ष्मी, गणेश अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. ते सर्वजण बेंगळूरमधील दो•बळ्ळापूर, हेंगसंद्र, कावलभैरसंद्र, कामाक्षीपाळ्या, यलहंका येथे वास्तव्यास होते. घटनास्थळी चिक्कबळ्ळापूर जिल्हा पोलीसप्रमुख डी. एल. नागेश यांनी भेट देऊन पाहणी केली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सकाळीच घटनेविषयी पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखाची मदत
चित्रावतीनजीक अपघातात मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. याविषयी ट्विट करताना त्यांनी, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दु:ख झाले. मृतांच्या आत्म्याला सद्गती लाभावी, अशी प्रार्थना करीत आहे, अशा शब्दात शोकभावना व्यक्त केल्या. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे सांगितले.