महापूर, वीज कोसळून बिहारमध्ये 13 बळी
राजस्थानमध्ये 7 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बिहारमध्ये सोमवारी सायंकाळपर्यंतच्या 24 तासात महापूर आणि वीज कोसळून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात वीज पडून 9 जणांना आपले प्राण गमवावे लागले. त्यापैकी सर्वाधिक 5 जणांचा मृत्यू बांका येथे झाला. तसेच गयाजी येथे 2, नालंदा आणि पटना येथे प्रत्येकी एकाचा पुरामुळे मृत्यू झाला. राजस्थानमध्येही सोमवारी पावसाशी संबंधित घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. भिलवाडा येथे नाल्यात वाहून गेल्यामुळे दोन चुलत भावांचा मृत्यू झाला. तसेच राजसमंद येथे एका भाऊ-बहिणीचा तलावात बुडून मृत्यू झाला.
मध्यप्रदेशातील छतरपूर, टिकमगढ, अशोकनगर आणि गुना येथे पूरस्थिती आहे. रविवारपासून या जिह्यांतील अनेक गावे पुराच्या विळख्यात आहेत. छतरपूरमधील धासन नदीत एक पिकअप वाहून गेल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. चालू पावसाळी हंगामात हिमाचल प्रदेशात पाऊस, पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे 98 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 770 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मंडी येथील चंदीगड-मनाली महामार्ग पुन्हा एकदा भूस्खलनामुळे बंद झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उत्तर प्रदेशातील धरणे भरून वाहू लागली आहेत. ललितपूरमधील गोविंद सागर धरणाचे 17 दरवाजे उघडण्यात आले आहेत. वाराणसीमध्ये गंगा नदीला पूर आला आहे. रत्नेश्वर महादेव मंदिर 80 टक्के पाण्याखाली गेले आहे.