भाविकांवर काळाचा घाला : 13 ठार
देवदर्शन घेऊन गावी परतताना टेम्पो ट्रॅव्हलरची ट्रकला धडक : चौघे गंभीर : हावेरी जिल्ह्यातील गुंडेनहळ्ळी क्रॉसजवळ दुर्घटना
हावेरी : भरधाव टेम्पो टॅव्हलरची रस्त्याशेजारी उभ्या करण्यात आलेल्या ट्रकला धडक बसून पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हावेरी जिल्ह्यातील गुंडेनहळ्ळी क्रॉसजवळ (ता. ब्याडगी) झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी पहाटे 3.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून देवदर्शन घेऊन गावी परतताना भाविकांवर क्रूर काळाने घाला घातला आहे. हावेरीहून राणेबेन्नूरला जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली आहे. अपघातातील सर्व मृत व जखमी शिमोगा जिल्ह्यातील हेम्मेहट्टी, ता. भद्रावती येथील राहणारे असून हे सर्व जण नातेवाईक आहेत. टेम्पो ट्रॅव्हलर चालकासह तीन पुरुष, आठ महिला व दोन मुले या अपघातात दगावले आहेत. घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलीसप्रमुख अंशुकुमार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ब्याडगी पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली असून ब्याडगीचे पोलीस निरीक्षक महांतेश लंबी पुढील तपास करीत आहेत.
टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये एकूण 17 जण प्रवास करीत होते. महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील काही धार्मिकस्थळांना भेटी देऊन ते गावी परतत होते. चिंचली, ता. रायबाग येथील मायाक्कादेवी, सौंदत्ती यल्लम्मादेवीचे दर्शन घेऊन हावेरी-राणेबेन्नूर मार्गावरून भद्रावतीला परतताना हा अपघात घडला आहे. 24 जून रोजी हे सर्व कुटुंबीय प्रवासासाठी बाहेर पडले होते. नागेश्वर राव आणि विशालाक्षी या दाम्पत्याचा मुलगा आदर्श याने 15 दिवसांपूर्वीच नवीन टेम्पो ट्रॅव्हलर खरेदी केला होता. त्याची पूजा करून हे सर्वजण देवदर्शनासाठी बाहेर पडले होते. देवदर्शन घेऊन गावी परतताना शुक्रवारी पहाटे टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण अपघात झाला. टेम्पो ट्रॅव्हलरची ट्रकला बसलेली धडक इतकी भीषण होती की, ट्रॅव्हलरमध्ये अनेक प्रवासी चिरडले गेले होते. अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. अतिवेग व दुर्लक्षपणामुळे हा अपघात घडल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख अंशुकुमार यांनी पत्रकारांना सांगितले. सायंकाळी सर्व 13 मृतदेहांवर हावेरी जिल्हा इस्पितळातील शवागारात उत्तरीय तपासणी करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर ते भद्रावतीला नेण्यात आले. मृतांच्या कुटुंबीयांना पालकमंत्री शिवानंद पाटील यांनी वैयक्तिक स्तरावर प्रत्येकी 50 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य केले आहे.
सरकारकडून प्रत्येकी 2 लाखाची मदत
हावेरीनजीक अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर केली. तसेच या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करून शोक व्यक्त केला. विद्यमान खासदार बसवराज बोम्माई यांनी देखील अपघाताचे वृत्त ऐकून धक्का बसला आहे, मृतांच्या आत्म्याला सद्गती लाभो, अशा शब्दात शोकभावना व्यक्त केली.
राष्ट्रपतींना दु:ख
हावेरी जिल्ह्यात घडलेल्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. यासंबंधीची बातमी ऐकून आपल्याला दु:ख झाले आहे, अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दु:ख व्यक्त केले आहे. जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होवो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.
आयएएस होण्याचे स्वप्न अधुरे
अपघातात मृत्युमुखी पडलेली 20 वर्षीय मानसा ही अंध विद्यार्थिनी होती. ती एमएससी पदवीधर होती. आयएएस होण्याचे तिचे स्वप्न होते. त्यासाठी ती बेंगळूरला रहात होती. नवीन टेम्पो ट्रॅव्हलरमधून देवदर्शनाला जाण्यासाठी कुटुंबीयांनी तिलाही बोलावून घेतले होते. भारतीय अंधांच्या फुटबॉल संघाचे मानसा प्रतिनिधित्व करत होती. तिला अनेक पुरस्कारही मिळाले होते. हेम्मेहट्टी गावावर शोककळा पसरली आहे. मृतांच्या घरासमोर शुक्रवारी सकाळपासूनच गावकरी व नातेवाईकांची गर्दी जमली होती. गावातील शाळेच्या आवारात अंत्यदर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली होती.