20 सर्वात प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 13 शहरांचा समावेश
मेघालयातील बर्नीहाट यादीत पहिल्या स्थानी : दिल्ली सर्वात प्रदूषित राजधानी
वृत्तसंस्था/ झ्यूरिच
जगातील 20 सर्वात प्रदूषित शहरांमध्ये 13 शहरं भारतातील आहेत. मेघालयातील बर्नीहाट या यादीत पहिल्या स्थानी आहे. तर दिल्ली सर्वात प्रदूषित राजधानी ठरली आहे. स्वीस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी कंपनी आयक्यू एअरच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
अहवालात भारताला जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात प्रदूषित देश ठरविण्यात आले आहे. 2023 मध्ये भारत याप्रकरणी तिसऱ्या स्थानावर होता, म्हणजे भारतात पूर्वी पेक्षा प्रदूषणाच्या बाबतीत काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. 2024 मध्ये भारतात पीएम 2.5 च्या स्तरात 7 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. 2024 मध्ये पीएम 2.5 ची पातळी सरासरी 50.6 मायक्रोग्रॅम प्रति क्यूबिक मीटर राहिली. तर 2023 मध्ये हे प्रमाण 54.4 मायक्रोग्रॅम प्रति क्यूबिक मीटर होते. तरीही जगातील 10 सर्वात प्रदूषित शहरांपैकी 6 शहरे भारतातील आहेत. दिल्लीत सातत्याने प्रदूषणाची पातळी अत्याधिक नोंदली गेली आहे. तेथे पीएम 2.5 ची सरासरी वार्षिक पातळी 91.6 मायक्रोग्रॅम प्रति क्यूबिक मीटर राहिली.
ओशिनिया सर्वात साफ क्षेत्र
ओशिनियाला 2024 मधील जगातील सर्वात स्वच्छ क्षेत्र ठरविण्यात आले आहे. या क्षेत्रातील 57 टक्के शहरांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या दिशानिर्देशांची पूर्तता केली आहे. ओशिनिया क्षेत्रात 14 देश असून यात ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, फिजी, पापुआ न्यू गिनी, नौरु, किरिबाती, मायक्रोनेशिया आणि मार्शल आयलँड्स सामील आहेत. अहवालानुसार दक्षिणपूर्व आशियाच्या प्रत्येक देशात पीएम 2.5 च्या प्रकरणी सुधारणा झाली आहे. परंतु सीमापार धूके अन् अल नीनोची स्थिती अद्याप प्रमुख घटक ठरला आहे.
प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात
भारताच्या अनेक शहरांमध्ये पीएम 2.5 चा स्तर 10 पट अधिक राहिला आहे. भारतातील 35 टक्के शहरांमध्ये हवेत धुळीच्या छोट्या छोट्या कणाचा स्तर जागतिक आरोग्य संघटनेकडून नमूद पातळीपेक्षा 10 पट अधिक आहे. या खराब हवेमुळे भारतात लोकांचे आरोग्य धोक्यात आहे. लोकांचे सरासरी आर्युमान 5.2 वर्षांनी कमी होत आहे. एका संशोधनानुसार 2009-19 दरम्यान भारतात दरवर्षी सुमारे 15 लाख लोकांचा मृत्यू हवा प्रदूषणामुळे झाला आहे.