दीपगृहाच्या भिंतीत मिळाली 122 वर्षे जुनी बाटली
बाटलीत होते ऐतिहासिक पत्र
टास्मानियात ऑस्ट्रेलियातील सर्वात जुन्या दीपगृहाच्या एका भिंती लपविण्यात आलेल्या एका रहस्यमय बाटलीत 122 वर्षे जुना ऐतिहासिक संदेश मिळाला आहे. यामुळे इतिहासकारांची उत्सुकता वाढली आहे. ही दुर्लभ वस्तू टास्मानियाच्या केप ब्रूनी दीपग़ृहात एका तज्ञ चित्रकार ब्रायन बर्फोर्डकडून बेटावर असलेल्या वारसास्थळात सामील दीपगृहाच्या कंदील कक्षात नियमित संरक्षण कार्यादरम्यान शोधण्यात आली आहे. टास्मानिया पार्क आणि वन्यजीव सेवेने यासंबंधी माहिती दिली आहे. चित्रकाराने भिंतीच्या अत्यंत खराब हिस्स्यावर काम करताना काही असामान्य गोष्ट पाहिली आणि बारकाईने निरीक्षण केले असता ही एक काचेची बाटली असल्याचे आणि त्यात पत्र असल्याचे आढळून आले. ही बाटली होबार्ट येथे नेण्यात आली, जेथे टास्मानियन संग्रहालय आणि कला दालनाच्या संरक्षकांनी काळजीपूर्वक ती उघडली आणि नाजुक सामग्री बाहेर काढण्यापूर्वी बिटुमेनमध्ये गुंडाळलेल्या कॉर्कला कापून हटविण्यात आले. याच्या आत एक लिफाफा होता, यात 29 जानेवारी 1903 रोजी लिहिण्यात आलेली दोन पानांचे हस्तलिखित पत्र होते. हे होबार्ट मरीन बोर्डाचे तत्कालीन दीपगृह निरीक्षक जेम्स रॉबर्ट मीच यांनी लिहिले होते.
दीपगृहातील बदलांची माहिती
पत्रात दीपगृहात करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण कार्यांचा तपशील देण्यात आला होता, यात लाकडी जिन्याच्या जागी नवी लोखंडी सर्पिल जिना, नवे काँक्रिट फर्श आणि कंदील कक्ष स्थापित करण्याविषयी लिहिले गेले होते. यात प्रकाश चमकण्याच्या क्रमात होणाऱ्या बदलांचीही नोंद करण्यात आली होती. या प्रकल्पात सामील देखभालदार आणि कर्मचाऱ्यांच्या नावांचीही यादी यात होती. या कार्यावर मरीन बोर्डाला 2,200 पाउंडचा खर्च आला होता, आताच्या मूल्यात ही रक्कम 4 लाख 74 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्ससमान आहे. संदेशाची स्थिती उल्लेखनीय होती, हे पत्र आम्हाला दीपगृहात झालेले कार्य आणि या कार्यात सामील लोकांविषयी माहिती देते. ही माहिती ब्रूनी बेट आणि केप ब्रूनी दीपगृहाच्या समृद्ध इतिहासात भर पाडत असल्याचे ऐतिहासिक वारशासाठी पीडब्ल्यूएस व्यवस्थापक अनिता वाघोर्न यांनी सांगितले.
1838 मध्ये दीपगृहाला प्रारंभ
केप ब्रूनी दीपगृह पहिल्यांदा 1838 साली प्रज्ज्वलित करण्यात आले होते. या दीपगृहाने 150 पेक्षा अधिक वर्षांपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या सर्वात धोकादायक जलक्षेत्रांमध्ये जहाजांना मार्गदर्शन केले. यानंतर 1996 मध्ये हे बंद करण्यात आले आणि याच्या स्थानी नजीकच सौरऊर्जेने संचालिन लाइट बसविण्यात आली.