1200 जणांना आत्महत्येसाठी केले प्रवृत्त
आईच्या मृत्यूनंतर कॅनेडियन शेफकडून विषाची विक्री : सेकंड डिग्री मर्डरचे आरोप
वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडाच्या एका शेफवर 40 देशांमधील लोकांना सुसाइड किट विकल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्याच्याविरोधात 14 नवे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यात आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे आणि सेकंड डिग्री मर्डर यासारखे आरोप सामील आहेत. यापूर्वी त्याच्या विरोधात 12 गुन्हे नोंद होते. केनेथ लॉ याला पोलिसांनी मे महिन्यात अटक केली होती. कॅनडाचा पॉइजन शेफ या नावाने प्रसिद्ध झालेल्या केनेथने रासायनिक पदार्थयुक्त सुमारे 1200 पाकिटांची विक्री केली होती असे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.
मागील 2 वर्षांमध्ये केनेथकडून हे पाकीट खरेदी केलेल्या सुमारे 272 जणांची ओळख ब्रिटनच्या नॅशनल क्राइम एजेन्सीने तपासानंतर पटविली आहे. यातील सुमारे 88 जणांनी आत्महत्या केली आहे. याचबरोबर केनेथशी निगडित मृत्यू प्रकरणांची यादी मिळाली आहे. अमेरिका, इटली आणि ऑस्ट्रेलियात देखील या सुसाइड किटचे पाकीट लोकांनी खरेदी केल्याची माहिती मिळाली असल्याचे न्यूझीलंडच्या कोरोनर कोर्टाने म्हटले आहे.
एप्रिल 2022 मध्ये ब्रिटनमधील एका महिलेने आत्महत्या केली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान कॅनडाच्या मिसिसॉगाचा एक पोस्ट बॉक्स आणि कॅनेडियन व्यक्तीच्या वेबसाइटवर संशय व्यक्त झाला. यानंतर मार्च महिन्यात कॅनडाच्या ब्रॅम्पटनमध्ये एका व्यक्तीचा रासायनिक पदार्थ खाल्ल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणी तपास करत असताना पोलिसांनी केनेथ लॉ याचा यातील सहभाग शोधून काढत त्याला अटक केली. 57 वर्षीय केनेथ हा पेशाने एक शेफ आहे. लोकांना आत्महत्येचा सल्ला देणे आणि त्याकरता मदत करण्याचा आरोप त्याच्यावर आहे. आरोपपत्रानुसार आत्महत्या करू इच्छिणाऱ्या लोकांना तो एक रासायनिक पदार्थ देत होता.
पुण्याचे काम करतोय
केनेथ लॉने एका ब्रिटिश वृत्तपत्राच्या एका अंडरकव्हर रिपोर्टरला स्वत:च्या कामाविषयी सांगितले होते. मागील 2 वर्षांपासून माझ्या अनेक ग्राहकांचा मृत्यू झाला आहे. मी हे पाकीट अनेक देशांमधील शेकडो लोकापर्यंत पोहोचविले आहे. काही ग्राहक मला अत्यंत पुण्याचे काम करत असल्याचे सांगतात. माझ्या आईचा मृत्यू झाल्यावर मी हे काम सुरू केले होते. आमची मानसिकता अद्याप इतकी आधुनिक झालेली नाही की आम्ही उघडपणे मृत्यूचा स्वीकार करू शकू असे केनेथने या रिपोर्टरला उद्देशून सांगितले होते. तपास सुरू झाल्यावर केनेथची वेबसाइट बंद झाली आहे.
5 कंपन्यांद्वारे विषाची विक्री
तपासादरम्यान पोलिसांना कॅनडामध्ये अशी दोन प्रकरणे आढळून आली ज्यात लोकांनी केनेथ लॉच्या एका वेबसाइटवरून विषारी पदार्थ खरेदी करत त्याचे सेवन केले होते आणि त्यांचा मृत्यू झाला होता. मे महिन्यात ओंटारियोच्या पोलिसांनी अलर्ट जारी करत 5 कंपन्यांची नावे उघड केली होती. संबंधित कंपन्यांकडून कुठलेही पाकीट खरेदी केले जाऊ नये असे यात म्हटले गेले होते. याचदरम्यान पोलिसांनी ब्रिटनमध्ये आत्महत्या करणाऱ्या महिलेने देखील यातील एका वेबसाइटवरुन पाकीट खरेदी केल्याचे उघडकीस आणले होते. रासायनिक पदार्थाच्या तपासणीत ते सोडियम नायट्राइट असल्याचे स्पष्ट झाले होते.
काय आहे सोडियम नायट्राइट
सोडियन नायट्राइट एक पांढऱ्या रंगाचा पदार्थ असतो, जो खाद्यपदार्थांमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून वापरला जातो. अनेकदा प्रक्रियाकृत मांसामध्ये हे आढळून येते. कॅनडाच्या पोलिसांनुसार हा पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ल्यात शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने मृत्यू ओढवतो. केनेथे 2020 पासून स्वत:च्या वेबसाइट्स चालवत होता. त्याने तपासादरम्यान पीडितांशी निगडित माहिती पुरविण्यास नकार दिला. परंतु रासायनिक पदार्थ खरेदी करणाऱ्यांमध्ये बहुतांश जण 16-36 वयोगटातील लोक होते असे सांगितले.