शिवकालीन 12 गड-किल्ले ‘युनेस्को’च्या वारसा यादीत
भारतातर्फे ‘मराठा लष्करी भूप्रदेश’अशी ओळख, जगभरातील 32 स्थळांचे मूल्यांकन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारच्या प्रयत्नाने आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने राजे शिव छत्रपतींच्या 12 गड-किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये स्थान मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी भारत सरकारने ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ (श्aratप्a श्ग्त्ग्tarब् थ्aह्म्aेज द घ्ह्ग्a) या संकल्पनेअंतर्गत नामांकन प्रस्ताव सादर केला होता. या किल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यासाठी भारतातर्फे सादर करण्यात आलेल्या ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ या गड-किल्ल्यासंबंधी वास्तूला स्थान मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात होते. 6 जुलैपासून पॅरिसमध्ये सुरू झालेल्या युनेस्को जागतिक वारसा समितीच्या (डब्ल्यूएचसी) 47 व्या सत्रात या प्रस्तावाचे मूल्यांकन केले जात होते. या सत्रात जगभरातील एकूण 32 नवीन स्थळांच्या नामांकनांचा विचार करण्यात आला. यामध्ये भारताच्या ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ या ऐतिहासिक लष्करी व्यवस्थेचा समावेश होता. 2024-25 या वर्षासाठी भारताने हे नामांकन सादर केले होते.
‘मराठा लष्करी भूप्रदेश’ म्हणजे काय?
‘मराठा लष्करी भूप्रदेश’मध्ये 17 व्या ते 19 व्या शतकादरम्यान विकसित केलेले 12 किल्ले आणि तटबंदी असलेले क्षेत्र समाविष्ट आहेत. हे किल्ले मराठा साम्राज्याच्या लष्करी शक्ती, रणनीती आणि बांधकाम कलेचे एक अद्भुत उदाहरण मानले जातात. हे किल्ले केवळ सुरक्षेसाठीच नव्हे तर धोरणात्मकदृष्ट्या देखील अत्यंत महत्त्वाचे होते. महाराष्ट्र आणि तामिळनाडूतील एकूण 12 गड-किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यात साल्हेर किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड, खांदेरी किल्ला, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे. हे किल्ले मराठा राजवटीच्या लष्करी सामर्थ्याचे प्रतिबिंब अधोरेखित करतात. यामध्ये डोंगराळ प्रदेश, समुद्रकिनारा आणि अंतर्गत मैदानांवर बांधलेल्या किल्ल्यांचा एक अनोखा संगम दिसून येतो.
मूल्यांकन प्रक्रिया
जागतिक वारसा समितीच्या बैठकीत 32 स्थळांचा आढावा घेण्यात आला. भारताच्या ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ या नामांकनासोबतच कॅमेरूनचा दि-गिड-बी सांस्कृतिक क्षेत्र, मलावीचा माउंट मुलांजे सांस्कृतिक लँडस्केप आणि युएईचा फाया पॅलिओलँडस्केप यासारख्या स्थळांवर देखील चर्चा केली जात आहे. याशिवाय, आधीच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या सीमांमध्ये संभाव्य बदलांचे प्रस्ताव देखील विचारात घेतले जात आहेत.
‘एक देश, एक नामांकन’ नियम
युनेस्कोच्या ‘ऑपरेशनल गाइडलाईन्स 2023’ नुसार कोणताही देश एकावेळी फक्त एकच नामांकन सादर करू शकतो. भारताने या वर्षासाठी ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ म्हणजेच ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स’ ही गड-किल्ल्यांची रचना निवडली गेली. या नामांकनाला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्याने भारतासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे. आता या ऐतिहासिक स्थळांची जागतिक ओळख वाढून पर्यटनाला बहर येईल आणि त्यांच्या संवर्धनाच्या प्रयत्नांना आणखी चालना मिळणार आहे.