ग्रेटा थनबर्गसह 12 जण इस्रायलच्या ताब्यात
गाझाच्या दिशेने जाणाऱ्या ‘एड’ जहाजाला रोखले
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायलने गाझाच्या दिशेने जाणाऱ्या फ्रीडम फ्लोटिलाच्या मॅडलीन जहाजाला ताब्यात घेतले आहे. या जहाजातून पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग समवेत 12 कार्यकर्ते प्रवास करत होते. ग्रेटासमवेत कुठल्याही कथित कार्यकर्त्याला गाझामध्ये जाण्याची अनुमती देणार नसल्याचे इस्रायलच्या सैन्याने पूर्वीच स्पष्ट केले होते. तरीही कथित कार्यकर्त्यांनी गाझामध्ये शिरण्याचा प्रयत्न केल्याने इस्रायलच्या सैन्याने जहाजाला इंटरसेप्ट करत ताब्यात घेतले आहे. मॅडलीनला अशदोद बंदरावर आणले गेल्याचे इस्रायलने सांगितले. तर उपासमारीच्या तोंडावर असलेल्या गाझासाठी मदतसामग्री घेऊन जात होतो असे कार्यकर्त्यांचे सांगणे आहे.
‘सेलिब्रिटीज’च्या ‘सेल्फी नौके’ला सुरक्षित स्वरुपात इस्रायलच्या किनाऱ्यावर आणले गेल्याचे इस्रायलच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. ग्रेटा आणि इतरांनी हा स्टंट केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी केला आहे. मागील दोन आठवड्यांमध्ये गाझामध्ये पुरेशी मदत पोहोचविण्यात आल्याचे इस्रायलने सांगितले आहे.
मॅडलीनवर ओतला पांढरा पदार्थ
गाझा फ्रीडम फ्लोटिलाचे समर्थन करणाऱ्या इंटरनॅशनल सॉलिडेरिटी मूव्हमेंटचे सह-संस्थापक हुवैदा अराफ यांनी जहाजावर पांढरा पदार्थ ओतण्यात आल्याने सर्वांच्या डोळ्यांमध्ये जळजळ होऊ लागल्याचा दावा केला. ड्रोनद्वारे हा पांढरा पदार्थ ओतण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.
मॅडलीनला रोखले
इस्रायलच्या कमांडेंनी आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात मॅडलीन जहाजाला रोखून त्याची संपर्कयंत्रणा बंद केली. जहाजातून प्रवास करणाऱ्या सर्व लोकांना स्वत:चे फोन बंद करण्यास सांगण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. मॅडलीन गाझापट्टीत पुरेशा प्रमाणात मदतसामग्री घेऊन जात नसून हा केवळ प्रसिद्धीचा स्टंट असल्याची टीका इस्रायलच्या विदेश मंत्रालयाने केली. तसेच याला ‘सेल्फी याट’ संबोधिले. यात एक ट्रकपेक्षाही कमी मदतसामग्री होती.
इस्रायल-हमासदरम्यान वाक्युद्ध
गाझामध्ये पूर्वीच मदतसामग्री वितरित करण्यात येत असल्याचे म्हणत इस्रायलने हमास तसेच ग्रेटा थनबर्गसह अनेकांचे उपासमारीशी संबंधित दावे फेटाळले. तर गाझापट्टीत लोकांवर इस्रायलचे सैनिक आणि अमेरिकन सुरक्षा कंत्राटदारांनी गोळीबार केला असून यात 13 पॅलेस्टिनी मारले गेल्याचा दावा हमासने केला. गाझा सागरी क्षेत्र एक सक्रीय संघर्षक्षेत्र असून आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार नौसैनिक नाकाबंदीच्या अंतर्गत अनधिकृत जहाजांसाठी प्रवेश बंद असल्याचे इस्रायलने स्पष्ट केले.