For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छत्तीसगडमध्ये 12 नक्षलींची शरणागती

06:50 AM Dec 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
छत्तीसगडमध्ये 12 नक्षलींची शरणागती
Advertisement

1 कोटीचे इनाम असणारा कुप्रसिद्ध व्यक्ती शरण

Advertisement

वृत्तसंस्था / रायपूर

छत्तीसगड राज्याच्या खैरागढ जिल्ह्यातील बकरकट्टा पोलीस स्थानकाच्या कार्यकक्षेत्रातील 12 कुप्रसिद्ध नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. शरण आलेल्यांमध्ये रामधरे मज्जी या कुख्यात नक्षलवाद्याचाही समावेश आहे. त्याला पकडून देणाऱ्यास किंवा त्याचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास एक कोटीचे इनाम छत्तीसगड सरकारने घोषित केले होते. अनेक महिला नक्षलवादीही शरण आल्या असून त्यांनी हिंसा सोडून दिली असल्याची माहिती पत्रकारांना देण्यात आली.

Advertisement

शरण आलेले नक्षलवादी सीपाआय माओवादी गटाचे असल्याचे समजते. अनेक हिंसक कृत्यांमध्ये या गटाचा सहभाग होता. या गटासाठी काम करणाऱ्या अनेकांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. छत्तीसगड राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांच्या पुढाकाराने नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठे अभियान हाती घेतले आहे. येत्या तीन वर्षात राज्यातून नक्षलवाद पूर्णत: संपविण्याचा निर्धार या सरकारने केला असून तो यशस्वी होत आहे.

12 माओवादी कोण

रामधेर मज्जी, चंदू उसंडी , ललिता, जानकी, प्रेम, रामसिंह दादा, सुकेश पोट्टम, लक्ष्मी, शीला, सागर, कविता आणि योगिता अशी त्यांची शरण आलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. या नक्षलवाद्यांनी काही वर्षांपूर्वी मिनपा येथे 25 सुरक्षा रक्षकांचे हत्याकांड केले होते. तसेच 20 सुरक्षा रक्षकांना गंभीर जखमी केले होते. तेव्हापासून पोलिस त्यांच्या शोधात होते. आता ते शरण आल्याने नक्षलवाद्यांचा एक मोठा गट नष्ट झाला आहे, अशी माहिती छत्तीसगड पोलीसांनी दिली.

अमित शहा यांच्याकडून कौतुक

12 नक्षलवादी शरण आल्याच्या घटनेचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वागत केले आहे. छत्तीसगड सरकारने गेल्या 20 महिन्यांपासून नक्षलींना संपविण्याचे अभियान हाती घेतले असून आतापर्यंत या अभियानाद्वारे या जिल्ह्यात 500 हून अधिक नक्षलवादी शरण आले आहेत. त्यांच्यात 168 इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. जे माओवादी आणि नक्षलवादी हिंसेचा मार्ग सोडून शांततेचे जीवन व्यतीत करण्यास राजी असतील, त्यांच्यासाठी पुनर्वसन योजनाही भारत सरकार आणि छक्षीसगड सरकारने सज्ज केली आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक नक्षलवादी जीवनाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत.

चार जिल्ह्यांमध्ये प्रभावात घट

छत्तीसगड राज्याच्या दंतेवाडा, बस्तर, बीजापूर आणि नारायणपूर या चार जिल्ह्यांमध्ये 20 महिन्यांपूर्वी नक्षलवाद्यांचा मोठा प्रभाव होता. मात्र, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी एकत्रितरित्या चालविलेल्या अभियानामुळे तो मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. अनेक नक्षलवादी गटांनी शरणागती पत्करली असून या चार जिल्ह्यांमध्ये शरण आलेल्यांची संख्या 1 हजारहून अधिक आहे. सर्वाधिक शरणागतीच्या घटना बस्तर जिल्ह्यातील आहेत. या चार जिल्ह्यांमधून आतापर्यंत 944 पुरुष आणि 248 महिला दहशतवाद्यांनी हिंसेच्या मार्गाचा त्याग केला आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या साहाय्याने विविध उपयांचा अवलंब केला असून पुनर्वसानाचा कार्यक्रमही यशस्वी होत आहे.

Advertisement
Tags :

.