छत्तीसगड-दंतेवाडा येथे 12 नक्षलींचे आत्मसमर्पण
वृत्तसंस्था / रायपूर
छत्तीसगडमधील दंतेवाडा जिह्यात एका जोडप्यासह 12 नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलींमध्ये पश्चिम बस्तर विभागाचा एक डिव्हिजन कमिटी सदस्य, गडचिरोली विभागाचा एक डिव्हिजन कमिटी सदस्य, एक एरिया कमिटी सदस्य आणि माड डिव्हिजन प्लाटून क्रमांक 32 चा सेक्शन कमांडर यांचा समावेश आहे. या सर्वांचा नक्षलवादी कारवायांमध्ये थेट सहभागी असल्याचा आरोप होता. नक्षलवाद्यांच्या बंददरम्यान रस्ते खोदणे, झाडे तोडणे, नक्षलवादी बॅनर, पोस्टर लावणे यासारख्या घटनांमध्ये इतर नक्षलवाद्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे.
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांपैकी विभागीय समिती सदस्य चंद्रण्णा उर्फ बुर्सू पुनम (52) आणि अमित उर्फ हिंगा (26) यांच्यावर प्रत्येकी आठ लाख रुपयांचे बक्षीस होते. तसेच क्षेत्र समिती सदस्य आणि अमितची पत्नी अरुणा लेकम (25) हिच्यावर पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. तसेच देवा कवासी (22) याच्यावर तीन लाख रुपये, राजेश मडकम (35) याच्यावर दोन लाख रुपये, पायके ओयाम (25) याच्यावर एक लाख रुपये आणि कोसा सोधी (23), महेश लेकम (23) व राजू कर्तम (20) यांच्यावर प्रत्येकी 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.