For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीबोडगेश्वराच्या फंडपेट्या फोडून 12 लाख लंपास

12:18 PM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रीबोडगेश्वराच्या फंडपेट्या फोडून 12 लाख लंपास
Advertisement

सुरक्षा रक्षकाला खुर्चीला बांधून मारहाण : चार बुरखाधारी चोरटे सीसीटीव्हीत कैद

Advertisement

म्हापसा : म्हापशातील श्री बोडगेश्वर मंदिरात रविवारी मध्यरात्रीनंतर 2 वाजण्याच्या दरम्यान  चार बुरखाधारी चोरट्यांनी प्रवेश करून दोन फंडपेट्या फोडून 12 लाखांची रोकड लंपास केली आहे. बुरखाधारी चोरट्यांनी मंदिराचे सुरक्षारक्षक दशरथ ठाकूर याला धमकी देत मारहाणही केली आणि त्याचाच शर्ट काढून घेऊन त्या शर्टाद्वारे त्याला खुर्चीला बांधून ही चोरी केली. चित्रपटास शोभेल अशी ही पूर्वनियोजित चोरी असून या चोरीमुळे देवस्थान समितीबरोबर पोलिसही खडबडून जागे झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वी या मंदिरातील देवाच्या पादुकांची पेटी फोडण्यात आली होती. कालच्या चोरीप्रकरणी देवस्थान समितीने म्हापसा पोलिसांना माहिती दिल्यावर रात्री पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. सर्व बाजूनी चौकशी केली. सकाळपर्यंत पोलीस मंदिरात पंचनामा करीत होते.

मंदिरात होते मोठ्या प्रमाणात अर्पण

Advertisement

म्हापशातील श्री देव बोडगेश्वर संस्थान गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटकातही प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा देव म्हणून त्याची ख्याती आहे. त्यामुळे गरीबांपासून धनदांडग्यांपर्यंत अनेक भक्त दर्शनासाठी येत असतात. मोठ्या प्रमाणात अर्पण देत असतात. त्यामुळे या देवस्थानावर चोरट्यांची वक्रदृष्टी पडल्याने आता मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

चार बुरखाधारी शिरले मंदिरात

28 मार्च 2024 रोजी चोरट्यांनी देवाच्या पादुकांची पेटी फोडल्याने खळबळ माजली होती. त्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी सागर शिंदे (40) व आनंद नाईक (40) या मूळ कर्नाटक येथील संशयितांना गजाआड केले होते. मात्र त्याच ठिकाणी काल चार बुरखाधारी चोरट्यांनी दोन फंडपेट्या फोडून भक्तांनी अर्पण केलेल्या पैशांवर डल्ला मारला. चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सीसीटीव्हीतील फुटेजप्रमाणे चार बुरखाधारी चोरटे मध्यरात्रीनंतर 2.07 वा. बुरखा घालून देवस्थानात शिरले होते.

सुरक्षारक्षकाला बांधून टाकले

मंदिरात पहारा देत असलेला सुरक्षारक्षक दशरथ ठाकूर झोपला होता. फंडपेटी फोडत असल्याच्या आवाजामुळे तो उठला असता चोरट्यांनी त्याला चाकूचा धाक दाखवला. त्याचा शर्ट काढून घेऊन त्याद्वारे त्याला खुर्चीला बांधले. त्यानंतर मंदिरातील दोन्ही फंडपेट्या फोडल्या. पहाटे 3 वा. एक व्यक्ती दर्शनासाठी देवळात आल्यानंतर त्याला हा सर्व प्रकार दिसला. त्याने सुरक्षारक्षकाला सोडवले. त्यानंतर देवळाजवळील पुजाऱ्याच्या घरी जाऊन दोघांनी माहिती दिली. पुजाऱ्याने देवस्थान समितीला संपर्क साधला. देवस्थान समितीने लगेच म्हापसा पोलिसांना माहिती दिली. देवस्थानच्या माहितीनुसार फंडपेट्यांमध्ये अंदाजे 12 लाख ऊपये होते.

सुरक्षारक्षक दशरथ ठाकूर जखमी

अज्ञात चोरट्यांनी सुरक्षारक्षक दशरथ ठाकूर याला मारहाण केल्यावर त्याच्या तोंडातून रक्त वाहू लागले. पहाटे पोलिसांनी त्याला म्हापसा आझिलो इस्पितळात दाखल केले. त्याची जबानी नोंद करून नंतर त्याला घरी सोडण्यात आले. मंदिरातील दोन महिन्यांपूर्वी फंडपेटी फोडण्यात आली तेव्हा याच सुरक्षा रक्षकामुळे चोरट्यांचा डाव फसला होता.

देव बोडगेश्वर चोरट्यांना पकडून देणार : पंडित

श्री देव बोडगेश्वर संस्थानचे सचिव अॅड. वामन पंडित दै. तऊण भारतशी बोलताना म्हणाले की, एकूण चारजण चोरटे होते. त्यांनी सुरक्षारक्षक ठाकूर याला मारहाण करून नंतर त्याला बांधून ठेवले. दोघे चोरटे त्याच्याजवळ होते तर दोघांनी फंडपेटी फोडून आतून पैसे काढले. हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. चोरट्यांनी कुलूपे तोडली नसून हूक तोडून पैसे लंपास केले आहेत. हा पूर्वनियोजित चोरट्यांचा कट असून सुरक्षारक्षक कुठे झोपतात? फंडपेटी कशी आहे याचा त्या चोरट्यांनी यापूर्वी अभ्यास केला असावा असे  पंडित म्हणाले. हे जागृत देवस्थान आहे. श्री देव बोडगेश्वर जागृत आहे. देव चोरट्यांना पकडून देणार असा विश्वास पंडित यांनी व्यक्त केली.

पहाटे पोलिसांनी गस्त घालावी

म्हापसा पोलिसांनी पहाटे 2 ते 4 यावेळेत या मंदिराच्या ठिकाणी गस्त घालावी अशी मागणी देवस्थानचे सचिव वामन पंडित यांनी बोलताना केली आहे. पोलिसांची गस्त सकाळी असते त्यावेळेत न करता पहाटे व मध्यरात्री केल्यास बरे होईल. चोरटे मध्यरात्री चोऱ्या करतात. जत्रा जानेवारीत झाली होती त्यानंतर फेब्रुवारी सुरुवातीस फंड पेटीतील पैसे काढले होते. नंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल अशा तीन महिन्याचे पैसे देवस्थानच्या फंडपेटीत होते. पैसे चोरट्यांनी लंपास केल्याचे पंडित यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.