बस-टेम्पोच्या धडकेत 8 मुलांसह 12 ठार
राजस्थानमध्ये विवाह समारंभातून परतताना काळाचा घाला
वृत्तसंस्था/ धौलपूर
राजस्थानमधील धौलपूर येथील राष्ट्रीय महामार्ग-11 ब वर एका भरधाव बसने टेम्पोला धडक दिली. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 8 मुलांचा समावेश असून तर 1 मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी धौलपूर जिल्हा ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शनिवारी रात्री उशिरा राजस्थानच्या धौलपूर जिह्यातील बारी पोलीस स्टेशन परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 11 बी वर एका वेगवान बसने टेम्पोला धडक दिली. या अपघातात टेम्पो चालक जखमी झाला असून त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारी शहरातील गुमट येथील करीम कॉलनी येथील रहिवासी असलेले सुमारे 15 जण सर्मथुरा भागातील बरौली येथे एका लग्न समारंभासाठी गेले होते. यामध्ये बहुतांश मुलांचा समावेश होता. रात्री उशिरा सर्वजण बारीकडे परतत असताना रस्ते अपघात झाला. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास धौलपूरहून जयपूरकडे जाणाऱ्या भरधाव बसने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 11 बी वरील सुन्नीपूर गावाजवळ टेम्पोला धडक दिली. या अपघातात बसचेही नुकसान झाले असून दोन्ही वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.
रात्री 12 वाजण्याच्या सुमारास जखमींना बारी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. वैद्यकीय पथकाने सर्वांना तातडीने उपचार देण्याचा प्रयत्न केला. 14 लोकांना ऊग्णालयात आणण्यात आले, त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला. चार जखमींना गंभीर अवस्थेत ढोलपूरला रेफर करण्यात आले, मात्र दोघांचा वाटेतच मृत्यू झाला. दोन जखमींवर धौलपूर ऊग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती बारी हॉस्पिटलचे पीएमओ डॉ. हरिकिशन मंगल यांनी दिली.