Karad News : कराडमध्ये अकरावीच्या विद्यार्थ्याची वसतिगृहात आत्महत्या
शिक्षणाच्या ताणामुळे आत्महत्येची घटना
कराड : येथील एका नामांकित महाविद्यालयात अकरावीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने बसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. आर्यन अधिकराव फडतरे (वय १७, रा. गोंदवले, ता. माण) असे त्याचे नाव असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन हा कराडच्या विद्यानगरमधील नामांकित महाविद्यालयात अकरावी इयत्तेत शिकत होता. शिक्षणाच्या सोयीसाठी तो शहरातील एका बसतिगृहात राहात होता. गुरुवारी सकाळी त्याच्या खोलीचा दरवाजा उघडत नसल्याने इतर विद्यार्थ्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. आत पाहिल्यावर आर्यनने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दिसले यांच्यासह शहर पोलीस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. आर्यनच्या आत्महत्येमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेने त्याचे मित्र आणि शिक्षकवर्ग हादरला आहे. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.