प्रो कबड्डी लीगचा 11 वा हंगाम 18 ऑक्टोबरपासून
हैदराबाद, नोएडा व पुण्यात रंगणार प्रारंभीचे तीन टप्पे
वृत्तसंस्था/ मुंबई
प्रो कबड्डी लीगने त्यांचा 11 वा हंगाम 18 ऑक्टोबरपासून सुरू होईल, असे जाहीर केले आहे. या वर्षाच्या सुऊवातीला प्रो कबड्डी लीगने 10 वा हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर जगातील सर्वांत मोठी कबड्डी लीग ऑक्टोबरमध्ये नवीन टप्प्यात पाऊल ठेवेल.
प्रो कबड्डी लीग 11 व्या हंगामात परत तीन शहरांमध्ये खेळविली जाणार आहे. या स्पर्धेची सुऊवात 18 ऑक्टोबर रोजी हैदराबादच्या गचिबोवली इनडोअर स्टेडियममध्ये होईल. त्यानंतर 10 नोव्हेंबरला दुसरा टप्पा नोएडा इनडोअर स्टेडियममध्ये सुरू होईल, तर तिसरा टप्पा 3 डिसेंबरपासून पुण्यातील बालेवाडी बॅडमिंटन स्टेडियमवर होईल. प्लेऑफच्या तारखा आणि ठिकाणे नंतर जाहीर केली जातील.
पीकेएल सिझन 11 च्या तारखांची घोषणा करताना प्रो कबड्डी लीगचे लीग आयुक्त अनुपम गोस्वामी म्हणाले की, पीकेएलच्या 11 व्या मोसमाच्या सुऊवातीच्या तारखा आणि ठिकाणे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. 10 वा मोसम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर पीकेएल सिझन 11 लीगच्या निरंतर वाढीत एक नवीन टप्पा पार करेल. यामुळे भारतासह जगभरातील कबड्डीच्या वाढीला बळकटी मिळेल, असे त्यांनी सांगितले.
प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या मोसमासाठीचा लिलाव 15-16 ऑगस्ट या कालावधीत मुंबईत आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये आठ खेळाडूंना 1 कोटी ऊपयांपेक्षा जास्त किंमत मिळाली होती, हा एक नवीन विक्रम आहे. सचिन, ज्याला तमिळ थलायवासने विकत घेतले आहे, तो सर्वांत महागडा खेळाडू ठरला होता. त्याला 2.15 कोटी ऊपयांना करारबद्ध करण्यात आले होते. या लिलावात एकूण 118 खेळाडूंना 12 संघांनी करारबद्ध केले होते.