महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अकरावीचे प्रश्न

07:00 AM Mar 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दहावीचे वर्ष संपल्यावर सर्वच मुला-मुलींना अकरावीचे वेध लागलेले असतात.  दहावीचे वर्ष शालेय जीवनात सर्वात जास्त महत्वाचे असल्यामुळे अभ्यास करण्यास पालक, नातेवाईक, शिक्षक नियमितपणे सांगतात. सर्वात उत्तम महाविद्यालयात प्रवेश मिळावा या उद्देशाने अनेक मुले-मुली दहावीचा अभ्यास फार जोमाने करतात.  तसेही बोर्डाच्या परीक्षेचा पॅटर्न बदलला असल्यामुळे सत्तर टक्क्यापेक्षा अधिक मार्क मिळवणे फारच सोपे झाले आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर सायन्स-कॉमर्स-आर्ट्स-डिप्लोमा यापैकी कुठे प्रवेश घ्यायचा हे ठरते. 80 टक्क्यापेक्षा जास्त मार्क मिळाल्यावर सायन्सला प्रवेश घेतला जातो. जास्त मार्क मिळाल्यावर सायन्स व्यतिरिक्त इतर शाखांना प्रवेश घेणे अनेक पालकांच्या दृष्टीने कमीपणा घेण्यासारखे असते. दहावीच्या विद्यार्थ्यांचे करियर मार्गदर्शनाचे कितीही वर्ग घेतले तरीही पालकांची इच्छा त्यावर मात करते आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी पालकांचे मन दुखावणार नाही याची काळजी घेऊन ते म्हणतील त्या दिशेला पूर्व समजतात.

Advertisement

अकरावीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर काय परिस्थिती असते?

Advertisement

अलीकडेच सायन्सची निवड केलेल्या अकरावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना कोणता विषय आवडत नाही याची चाचपणी केली. पहिला प्रश्न विचारला, फिजिक्स (भौतिकशास्त्र) कोणाला आवडत नाही. हा प्रश्न विचारला जाईल अशी त्यांची अपेक्षा नव्हती. एकामागून एक हात वर येत गेले आणि बहुतेक विद्यार्थ्यांनी मान्य केले की हा सर्वात न आवडणारा विषय आहे. त्यानंतर हाच प्रश्न वेगळ्या पद्धतीने केमिस्ट्रीबद्दल विचारला. तुमच्यापैकी कोणाला केमिस्ट्री हा विषय सर्वात जास्त आवडतो? या प्रश्नाला कोणीच हात वर करण्याचे धाडस दाखवले नाही. जीवशास्त्र आणि गणित याबद्दल असेच प्रश्न विचारल्यावर एकूण अनुमान असे काढता आले की बहुतांश विद्यार्थ्याना/विद्यार्थिनींना न आवडणारे विषय तीन  फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथस्. यानंतर विचारलेल्या प्रश्नांमधून असे समजले की कोणाही विद्यार्थ्याने अकरावीची सर्व विषयांची पुस्तके अद्याप वाचलेली नाहीत. अकरावीमध्ये प्रवेश घेऊन आठ महिने होऊन गेले, आता दीड महिन्यावर वार्षिक परीक्षा येऊन ठेपली असताना अनेक विद्यार्थ्यांचे इंग्रजीचे अर्धेही पुस्तक वाचून झालेले नाही. अनेक विद्यार्थ्यांनी क्लास लावल्यामुळे त्यांना पुस्तके वाचण्याची गरज भासलेली नाही आणि त्यांना तसे करणे गरजेचे आहे, हे कोणी सांगितलेले नाही. बहुतांश विद्यार्थी महाविद्यालयातील लायब्ररीचा वापर करत नाहीत असेही आढळून आले. क्रमिक पुस्तके वाचली नसल्यामुळे लायब्ररीमध्ये मिळणारी संदर्भ पुस्तके वाचण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही.

अकरावीची परीक्षा चाळीस दिवसांवर आलेली असताना ही अवस्था का असते? याचे पहिले कारण महाविद्यालयीन शिक्षणामध्ये अधिक स्वातंत्र्य मिळाल्याचा आभास निर्माण झालेला असतो आणि अकरावी हा खरे तर महाविद्यालयीन शिक्षणाचा पाया असला तरी त्याकडे विश्रांतीचे वर्ष म्हणून बघितले जाते. शालेय शिक्षणामध्ये जे करता आले नाही (लेक्चर्सना गैरहजर राहणे वगैरे) ते महाविद्यालयीन शिक्षणामध्ये करता येते त्यामुळे स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याची मनोवृत्ती तयार झालेली असते. यामधून बाहेर पडण्यासाठी पहिले सहा महिने जातात. महाविद्यालयीन शिक्षणामध्ये फक्त सहाच विषयांचा अभ्यास करावा लागतो त्यामुळे सोपे असते, अशी धारणा पहिले काही महिने असते. शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण यामध्ये फरक काय असतो, स्व-अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये कोणता बदल करायचा असतो, हे सांगणारी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. क्लासेसला नाव नोंदवणे, तिथल्या तयार नोट्स मिळवणे आणि त्याच नोट्सचा वापर करून क्लासमध्ये दिलेली लेक्चर्स तोंडपाठ करणे, यामध्ये अकरावीच्या शिक्षणाचे बरेच महिने वाया जातात.

शालेय शिक्षणामध्ये शिक्षक धडा वाचून दाखवतात, प्रश्नांची उत्तरे कशी लिहावी याबद्दल मार्गदर्शन करतात, प्रश्नपत्रिका कशी सोडवावी, अभ्यास कसा करावा याबद्दल शिक्षकांकडून मार्गदर्शन केले जाते. शालेय शिक्षणामध्ये शाळेत धडा शिकवल्यानंतर तो धडा घरी वाचणे अपेक्षित असते. शालेय शिक्षणामध्ये क्रमिक पुस्तक वाचणे ही किमान अपेक्षा असते. परंतु महाविद्यालयीन शिक्षणाचे स्वरूप वेगळे असते. जसजशी इयत्ता वाढत राहते तसतसे स्व-अभ्यासाचे प्रमाण वाढत राहते. प्राध्यापक सहसा क्रमिक पुस्तकातील धडे वाचून दाखवत नसतात.  त्यांच्याकडून तशी अपेक्षा नसते. अभ्यासक्रमाला असलेला विषय, त्या विषयाचा आवाका विद्यार्थ्यांच्या लक्षात यावा, त्यासंदर्भात अवांतर वाचन करून त्या विषयाची व्याप्ती काय आहे, त्याचा परिचय करून देणे, हे काम प्राध्यापक करत असतात.  उद्या जो ‘धडा’ प्राध्यापक शिकवणार आहेत, तो क्रमिक पुस्तकातील विभाग विद्यार्थ्यांनी वाचल्यानंतर त्याविषयी प्रश्न प्राध्यापकांना विचारावेत आणि प्राध्यापकांनी त्यावर उत्तरे द्यावी, अशी अपेक्षा असते. ‘अजून आम्हाला हा धडा शिकवलेला नाही’ अशी तक्रार महाविद्यालयीन शिक्षणात अपेक्षित नसते. परंतु महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यावर आपण अभ्यासात काय बदल करावेत, हे कोणत्याही क्लासमध्ये सांगितले जात नाही.

क्रमिक पुस्तके वाचल्यानंतर त्या विषयाची गोडी लागण्यासाठी आणि त्या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी महाविद्यालयातील लायब्ररीमधून संदर्भ पुस्तके वाचून प्रत्येक आठवड्याला किमान एक पुस्तक बदलून आणावे आणि ते घरी वाचावे असे अपेक्षित असते. अकरावीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर वाचनाचा वेग वाढवणे आवश्यक असते कारण विषय सहा असले तरीही सखोल अभ्यास करण्यासाठी ताशी 30 ते 40 पाने वाचण्यापासून ताशी साठ पाने वाचणे असा वेग वाढवल्यास कमीतकमी वेळेत जास्तीत जास्त परिणामकारक अभ्यास करता येतो. आजच्या काळात कॉलेजच्या लायब्ररीचा वापर दहा टक्के विद्यार्थीसुद्धा करत नाहीत. त्यामुळेच त्यांना कोणत्याही विषयाची सखोल माहिती मिळत नाही. क्लासेसच्या मायाजालामध्ये फसलेले विद्यार्थी विषय समजण्यापेक्षा मार्क मिळवण्याचे कौशल्य प्राप्त करतात. अशा वृत्तीमुळे त्या विषयाचा ‘मार्केट’मध्ये वापर कसा केला जातो, याबद्दल अनभिज्ञता वाढीस लागते.

यावर उपाय अनेक आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता विद्यार्थ्यांनी इंग्रजी वृत्तपत्र वाचन वाढवावे. तसेच अभ्यासाच्या विषयांवर जवळपास व्याख्याने आयोजित केली जात असल्यास त्याचा लाभ घेणे केव्हाही इष्ट. अभ्यासाच्या विषयात गोडी लागण्यासाठी त्या विषयावर ज्यांनी संशोधन केले, त्याविषयी उत्तमोत्तम इंग्रजी चित्रपट बघावेत, ज्यामुळे इंग्रजी ऐकण्याचा रियाज होतोच शिवाय विषयाची व्याप्ती समजते. अ ब्युटीफुल माइंड, हिडन फिगर्स (गणित), द इमिटेशन गेम, जॉब्ज (कॉम्प्युटर), ओपनहायमर, अपोलो 13, इंटरस्टेलार (भौतिकशास्त्र  रसायनशास्त्र), रिचर्ड अटनबोरो यांच्या अनेक डॉक्युमेंटरी (जीवशास्त्र), पॅच अॅडम्स, अवेकनींग्ज (मेडिकल), द फाउंडर (बिझिनेस), ज्युली अँड ज्युलिया, शेफ (हॉटेल मॅनेजमेंट) अशा अनेक विषयांचा परिचय चित्रपटांच्या माध्यमातून करता येतो.  अकरावी-बारावीतील अभ्यासाच्या विषयाबद्दल पालकांनी कुतुहलापोटी प्रश्न विचारून मुला-मुलींना बोलते केल्यास त्या विषयामध्ये पूर्ण घराची गुंतवणूक राहते.  बारावीच्या परीक्षेसाठी ‘दिल्ली अब भी दूर है’ पण अकरावीच्या परीक्षेला फार कमी दिवस राहिले आहेत आणि विषयांमध्ये आवड अजूनही निर्माण झालेली नाही, अशी परिस्थिती घराघरामध्ये दिसू नये, यासाठी विद्यार्थ्यांनी वेळीच जागे व्हावे.

सुहास किर्लोस्कर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article