अमेरिकेतून भारतीयांची ‘घरवापसी’ सुरूच
शनिवारी व रविवारी दोन विमानांमधून 228 जण मायदेशी : प्रवाशांना यावेळीही ‘कड्या’
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेत बेकायदेशीर मार्गाने घुसलेल्या भारतीयांना घेऊन आणखी दोन विमाने भारतात दाखल झाली आहेत. शनिवारी रात्री 116 बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन 11:38 वाजता अमृतसरमध्ये एक विमान दाखल झाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रविवारी रात्री 112 प्रवाशांना घेऊन आणखी एक विमान दाखल झाले. एकंदर दोन फेऱ्यांमधून 228 जणांनी भारतात ‘घरवापसी’ केली आहे. यावेळीही सदर प्रवाशांच्या हातात व पायात कड्या लावण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले.
शनिवारी दाखल झालेल्या एकूण 116 प्रवाशांपैकी सर्वाधिक 67 लोक पंजाबमधील तर 33 जण हरियाणातील आहेत. याशिवाय, गुजरातमधील आठ, उत्तर प्रदेशातील तीन, गोवा-राजस्थान आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी 2 आणि हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी एक आहे. रविवारी दाखल होणाऱ्या विमानातून 157 प्रवासी परततील अशी माहिती देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात 112 जण अमृतसरमध्ये उतरल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली.
अमेरिकन विमानात भारतीयांसोबतच काही अमेरिकन सरकारी अधिकारी, क्रू मेंबर्स आणि अमेरिकन आर्मीचे कर्मचारी होते. अमेरिकेहून परतल्यानंतर, इतर राज्यातील लोकांना त्यांच्या मूळ राज्यात पाठवण्यात आले आहे. विमानतळावर पोहोचताच सर्व भारतीयांना एकमागोमाग एक करून बाहेर काढण्यात आले. यानंतर, त्यांना विमानतळावर उपस्थित असलेल्या भारत सरकारच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सोपवण्यात आले. विमानतळाच्या आत प्रथम सर्वांची कागदपत्रे तपासण्यात आली. यासोबतच एखाद्याचे काही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे की नाही हे देखील पाहिले गेले. सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्याला त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. गेल्या वेळीप्रमाणे यावेळीही अमेरिकन सैन्याचे हे विमान एव्हिएशन क्लबच्या दिशेने उतरवण्यात आले.
सुमारे 35 तासांचा प्रवास
अमेरिकन लष्करी विमानाने शुक्रवारी सकाळी भारतीय वेळेनुसार सुमारे 11 वाजता उ•ाण केले. 35 तासांच्या प्रवासानंतर शनिवारी मध्यरात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास ते अमृतसरला पोहोचले. तथापि, यावेळीही अमेरिकेने सर्व भारतीयांना हातात आणि पायात बेड्या घालून आणले आहे.
परतणाऱ्यांचे स्वागतच होईल : भगवंत मान
भारतीयांच्या हद्दपारीवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, ते सर्व आपले लोक आहेत. ते परदेशात कसेही गेले तरी, त्या सर्वांना पूर्ण आदर दिला जाईल. याशिवाय, परतणाऱ्या तरुणांना त्यांच्या क्षमतेनुसार काम दिले जाईल. आपल्याच देशात राहून आपला उदरनिर्वाह करू शकतील असे काम त्यांनी स्विकारावे असे त्यांनी स्पष्ट केले.
शनिवारी आलेल्या विमानात 116 प्रवासी
रविवारी रात्री 112 जण स्वदेशात दाखल
महाराष्ट्र-गोव्यातील प्रत्येकी दोन प्रवाशी