आणीबाणीप्रसंगी 112 ठरतोय संकटमोचक
आतापर्यंत 12 हजाराहून अधिक कॉल
बेळगाव : आणीबाणीप्रसंगी याआधी पोलिसांची मदत मिळविण्यासाठी 100 नंबरवर संपर्क साधला जात होता. आता यासाठी देण्यात आलेल्या 112 या क्रमांकावर तक्रारींचा पाऊसच सुरू आहे. अनेक जण 112 साहाय्यवाणीशी संपर्क साधून अडचणीच्या वेळी पोलीस दलाची मदत मिळवत आहेत.1 जानेवारी 2024 पासून आतापर्यंत 112 वर 12 हजार 381 हून अधिक कॉल आले आहेत. यापैकी बेळगाव जिल्ह्यातील विविध समस्या सांगण्यासाठी 717 जणांना साहाय्यवाणीने तातडीची मदत दिली आहे. हाणामारी, कौटुंबिक कलह आदींसंबंधी 9 हजार 45 हून अधिक तक्रारी आल्या आहेत. अनेक प्रकरणात पोलिसांनी संबंधितांची समजूत काढून ते मिटवले आहेत.
चोरी प्रकरणांसाठी 428 जणांनी 112 शी संपर्क साधले आहेत. अपघातानंतर मदतीसाठी 540 हून अधिक जणांनी संपर्क साधला असून बेकायदा व्यवसायांसंबंधी तक्रार करण्यासाठी 409 जणांनी 112 शी संपर्क साधले आहेत. 112 ला नागरिकांनी वेळेत दिलेली माहिती अनेक गुन्हेगारी प्रकरणे घडण्याआधीच थोपविण्यासाठी मदतीची ठरली आहे. अडचणीच्या वेळी लगेच पोलीस ठाण्यावरच पोहोचले पाहिजे, असे नाही. 112 शी संपर्क साधून पोलिसांची मदत मिळवता येते. यासाठी होयसळ पोलीस नेहमी तत्पर असतात. ही साहाय्यवाणी नागरिकांना त्वरित मदत पोहोचविण्यासाठी मदतीची ठरली आहे, असे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले.