1100 भारतीयांना अमेरिकेने पाठविले मायदेशी
डीएचएस अधिकाऱ्याने दिली माहिती
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेने अवैध वास्तव्य करणाऱ्या भारतीय नागरिकांना चार्टर्ड विमानाने भारतात परत पाठविले आहे. अमेरिकन होमलँड सिक्युरिटी विभागाने (डीएचएस) हे पाऊल भारत सरकारच्या सहकार्याने उचलण्यात आल्याची माहिती दिली आहे. अमेरिकेत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या भारतीय नागरिकांना परत पाठविले जाणार आहे. खोटी आश्वासने देणाऱ्या एजंट्सच्या भूलथापांना स्थलांतरितांनी बळी पडू नये असे डीएचएसचे वरिष्ठ अधिकारी किस्टी ए. कॅनेगलो यांनी म्हटले आहे.
डीएचएसने अलिकडेच भारतीय नागरिकांच्या एका समुहाला देशाबाहेर काढण्याची घोषणा पत्रकार परिषद आयोजित करत केली होती. डीएचएस अन्य देशांसोबत देखील संपर्कात आहे. या देशांचे नागरिक अमेरिकेत अवैध वास्तव्य करत असल्यास त्यांनाही त्यांच्या मायदेशी परत पाठविले जाणार आहे. अवैध स्थलांतर कमी करणे, सुरक्षित आणि वैध मार्गांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मागील एक वर्षात डीएचएसने कोलंबिया, इक्वेडोर, पेरू, इजिप्त, मॉरिटानिया, सेनेगल, उझ्बेकिस्तान, चीन आणि भारतासमवेत अनेक देशांच्या नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठविले आहे.
अमेरिकन आर्थिक वर्ष 2023-24 दरम्यान सुमारे 1100 भारतीय नागरिकांना त्यांच्या मायदेशी परत पाठविण्यात आल्याची माहिती इमिग्रेशन धोरणाचे सहाय्यक सचिव रॉयस मरे यांनी दिली आहे. या चार्टर्ड फ्लाइटमध्ये कुठलाही अल्पवयीन नव्हता. संबंधित सर्व भारतीय हे प्रौढ होते.