For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विविध ठिकाणी 11 भटकी कुत्री पकडली

06:39 AM May 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
विविध ठिकाणी 11 भटकी कुत्री पकडली
Advertisement

मनपाने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उचलले पाऊल

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

शहरामध्ये कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे. महानगरपालिकेने कुत्री पकडण्याची मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणूक असतानाही जनतेच्या आग्रहखातर कुत्री पकडण्याची मोहीम राबविण्यात आली असून शनिवारी विविध भागांमध्ये एकूण 11 कुत्री पकडण्यात आल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.

Advertisement

काही दिवसांपूर्वी अमननगर, उज्ज्वलनगर, गांधीनगर परिसरात कुत्र्यांच्या हल्ल्यांत 14 जण जखमी झाले होते. त्यानंतर तेथील रहिवाशांनी मनपाकडे धाव घेतली होती. कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी केली. त्यानंतर हल्ला केलेल्या कुत्र्याला मनपाच्या कर्मचाऱ्यांनी पकडले. वारंवार असे हल्ले घडत आहेत. तेव्हा शहरातील सर्वच परिसरातून भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

शनिवारी सदाशिवनगर, मार्कंडेयनगर (कंग्राळी खुर्द), नेहरुनगर, जाधवनगर,  हनुमाननगर, टीव्ही सेंटर, विश्वेश्वरय्यानगर, कुवेंपूनगर या परिसरातून 11 कुत्री पकडण्यात आल्याचे राजू संकन्नावर यांनी सांगितले. शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. मात्र सध्या निवडणूक असल्याने सर्व भागामध्ये कुत्री पकडणे अशक्य आहे. तरीदेखील ज्या ठिकाणी हल्ले होत आहेत, त्या ठिकाणी कुत्री पकडली जात आहेत. जनतेनेही त्यासाठी सहकार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

भटक्या कुत्र्यांना शिल्लक उसलेले अन्न काहीजण टाकत आहेत. याचबरोबर  मांस विक्रेते दुकानातील घाण रस्त्याशेजारीच टाकतात. ते अन्न व घाण खाण्यासाठी कुत्र्यांचा कळप जमा होत आहे. जेव्हा त्यांना अन्न मिळत नाही तेव्हा अचानकपणे ही कुत्री हल्ला करत आहेत. आम्ही कुत्री पकडण्यासाठी गेल्यानंतर ही कुत्री मात्र त्या परिसरातून इतर भागामध्ये जात आहेत. त्यामुळे कुत्र्यांना पकडणे अवघड जात असल्याचे सांगितले.

Advertisement
Tags :

.