For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानात हल्ल्यात 11 सैनिक ठार

06:32 AM Oct 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानात हल्ल्यात 11 सैनिक ठार
Advertisement

बंडखोर आणि सैनिकांमध्ये धुमश्चक्रीत अनेक ठार

Advertisement

वृत्तसंस्था / इस्लामाबाद

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात पाकिस्तानी सैन्यावर बंडखोरांकडून मोठा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 11 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. तेहरिए ए तालिबान पाकिस्तान या संघटनेने हा हल्ला केल्याची माहिती देण्यात आली आहे. याच संघटनेला पाकिस्तान तालिबान असेही संबोधले जाते. या प्रांतातील ओरखझाई जिल्ह्यात बंडखोर आणि सैनिक यांच्या तुंबळ संघर्ष होत आहे. या संघर्षात गेल्या चोवीस तासात 19 बंडखोरांचाही मृत्यू झाला आहे.

Advertisement

खैबर पख्तुनख्वा हा प्रांत अफगाणिस्तानला लागून आहे. या प्रांतातील मोठ्या भागावर व्यवहारत: पाकिस्तानचे शासन चालत नाही. गेल्या मंगळवारी रात्री येथे बंडखोरांविरोधात मोठी मोहीम पाकिस्तानी सैनिकांकडून हाती घेण्यात आली आहे. ‘फितना अल् खारीजी’ या बंडखोर संघटनेच्या विरोधात ही मोहीम उघडण्यात आली आहे. पाकिस्तानच्या सैन्याकडून तहरीक ए तालिबान पाकिस्तान या संघटनेचा उल्लेख फितना अल् खारीजी असा करण्यात येतो.

बंडखोरांच्या संपविण्याची भाषा

या भागात पाकिस्तानविरोधात मोठ्या प्रमाणात बंडखोरी होत आहे. हा भाग पाकिस्तानपासून स्वतंत्र करण्याच्या बंडखोरांच्या हालचाली आहेत. त्यामुळे बंडखोरांचा सफाया करण्यासाठी पाकिस्तानी सैनिक प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांमध्ये पाकिस्तानलाही मोठ्या प्रमाणात सैनिकांची हानी स्वीकारावी लागत आहे. काही दिवसांपूर्वी डेरा इस्लाईल भागात पाकिस्तानी सैनिकांनी 13 बंडखोरांना ठार केले होते. या हत्याकांडाचा सूड घेण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांवर हा हल्ला करण्यात आला आहे, अशी माहिती बंडखोरांकडून देण्यात आली आहे.

बंडखोरीत वाढ

गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानातील बंडखोरीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाकिस्तानच्या पश्चिमेला असणारे खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान या प्रातांमध्ये पाकिस्तानच्या प्रशासनाविरोधात मोटी हालचाल होत आहे. या प्रांतांमधील पाकिस्तान विरोधी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात बंड केले आहे. ते मोडून काढण्याचा प्रयत्न पाकिस्तान सरकार करीत आहे. तहरिक एक पाकिस्तान तालिबान हा सर्वात मोठा आणि सामर्थ्यवान पाकिस्तानविरोधी गट असून त्याचा संबंध अफगाणिस्तानशी आहे, अशी चर्चा आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानच्या वायुदलाने येथे बंडखोरांची वस्ती असलेल्या एका खेड्यावर वायुहल्ला केला होता. त्यात अनेक सर्वसामान्य नागरीकही ठार झाले होते. पाकिस्तानी सैनिक अत्यंत क्रूरपणे स्थानिकांची हत्याकांडे करीत आहेत, असा आरोप केला जात आहे.

संघर्ष जुनाच

पाकिस्तान आणि हे दोन प्रांत यांच्यातील संघर्ष जुनाच आहे. 1947 मध्ये पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळत असताना या दोन प्रांतांनी पाकिस्तानमध्ये समाविष्ट होण्यास नकार दिला होता. बलुचिस्तानला पाकिस्तानात जाण्यास भाग पाडू नका, अशी सूचना खान अब्दुल गफार खान यांनी त्यावेळच्या भारतातील  नेत्यांना केली होती. तथापि, भारताचे नेतृत्व करणाऱ्या या नेत्यांनी त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा या प्रांतांच्या पाठीशी उभे राहण्यास नकार दिला होता. त्यामुळे अनिच्छेनेच या भागातील स्थानिक पाकिस्तानमध्ये समाविष्ट झाले होते. तेव्हापासून या दोन्ही भागांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. अनेकदा या भागातील स्थानिक बंडखोर संघटनांचा पाकिस्तानच्या लष्कराशी संघर्ष झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये संघर्षाचे प्रमाण बरेच वाढल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानमध्ये घडणाऱ्या हिंसाचारात या दोन प्रांतातील हिंसाचाराचे प्रमाण सर्वाधिक आहे. पाकिस्तानातील एकंदर हिंसाचाराच्या 71 टक्के इतका हिंसाचार या दोन प्रांतातच होतो. हिंसेचे प्रमाणही अलिकडच्या काळात वाढले आहे.

Advertisement
Tags :

.