पाकिस्तानात हिंसाचारात 11 लोक ठार
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानातील दहशतवादी संघटना तहरीक ई लबैक पाकिस्तान आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष आता अधिकच उग्र झाला आहे. शुक्रवारी या संघटनेने कराची येथे मोठ्या मोर्चाचे आयोजन केले होते. आजही या संघटनेच आंदोलन पुढे होत राहिले आहेत. आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत 11 जण ठार झाले आहेत, असा आरोप या संघटनेच्या नेत्यांनी केला आहे.
या संघटनेकडून हे आंदोलन गाझा पट्टीत इस्रायलने केलेल्या कारवाईच्या विरोधात आहे. त्याचा प्रारंभ गुरुवारीच झाला होता. शुक्रवारच्या सकाळच्या नमाजानंतर प्रचंड संख्येने लोक रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. मोर्चाच्या अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाल्याने परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर गेली आहे. अनेक स्थानी दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे पोलिसांना प्रथम लाठीमार आणि नंतर गोळीबार करावा लागला, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
आझाद चौकात धुमश्चक्री
लाहोरच्या आझाद चौकात आंदोलक आणि पोलीस यांच्यात प्रचंड धुमश्चक्री झाली. मोर्चा आडविण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरीकेडस् आणि जहाजांचे कंटेनर्स उभे केले होते. त्याचप्रमाणे अनेक स्थानी मोठे चर खोदून आंदोलकांना आडविण्याची तयारी केली होती. तथापि, हे अडथळे ओलांडून असंख्य निदर्शक आझाद चौकात पोहचण्यात यशस्वी झाले, अशी माहिती देण्यात आली आहे.
इस्लामाबाद आणि रावळपिंडीची कोंडी
हे आंदोलन पाकिस्तानातील जवळपास सर्व मोठ्या शहरांमध्ये पसरले आहे. कराची आणि लाहोरच्या पाठोपाठ इस्लामाबाद आणि रावळपिंडी या दोन मोठ्या शहरांमध्येही प्रचंड मोर्चे काढण्यात आले आहेत. या दोन्ही शहरांमध्ये या मोर्चांमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. पोलिसांनी आवाहन करुनही आंदोलक माघार घेण्यास तयार नव्हते. सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली पण तणावग्रस्त आहे.