बिहारमध्ये वीज कोसळून 11 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ पाटणा
देशातील अनेक राज्यांमध्ये गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू आहे. बिहारमध्ये गेल्या 24 तासात वीज कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारीही राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्याने दणका दिला. या वाऱ्यासोबतच वळिवाच्या सरीही कोसळल्या. बिहारसोबतच आंध्रप्रदेश, तेलंगणा, ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि कर्नाटकच्या काही भागातही पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. याशिवाय झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, केरळ, कर्नाटक, सिक्कीम, अऊणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही हलका पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने आपल्या अहवालात म्हटले आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मान्सूनच्या निर्मितीचे वातावरण हळूहळू तयार होत आहे. पॅसिफिक आणि हिंदी महासागरात चांगल्या पावसासाठी आवश्यक बदल दिसू लागले आहेत. मान्सूनच्या आगमनानंतर काही आठवडे तटस्थ स्थिती राहिल्यानंतर ला निनाची परिस्थिती निर्माण होण्यास सुऊवात होईल, असा अंदाज आहे. दुसरीकडे, हिंदी महासागर द्विध्रुवीय स्थिती सकारात्मक होत असल्याची पुष्टी केली आहे.