शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेला अकरा लाखांचा गंडा
टिळकवाडी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ बेळगाव
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट नफा देण्याचे सांगत मंडोळी रोड, द्वारकानगर, टिळकवाडी येथील एका महिलेला 10 लाख 93 हजार रुपयांना गंडविण्यात आले आहे. यासंबंधी टिळकवाडी पोलीस स्थानकात दोघा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळच्या विद्यानगर-हुबळी व सध्या द्वारकानगर टिळकवाडी येथे राहणाऱ्या मधु महादेवप्पा शिरुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ. अरवराज गुप्ता व अनसुया या दोघा जणांवर भादंवि 406, 420 व माहिती-तंत्रज्ञान कायदा-66 (सी) व (डी) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी पुढील तपास करीत आहेत. दि. 5 मे 2024 रोजी फेसबुक मेसेज बघताना अचानक अपस्टॉक्स असलेल्या लिंकवर मधु यांनी क्लिक केले. त्यानंतर लगेच अपस्टॉक्स ऑफिशियल स्टॉक कम्युनिटी नामक व्हॉट्सअॅप ग्रुपवर त्या सहभागी झाल्या. तेथून त्यांच्या फसवणुकीला सुरुवात झाली.
डॉ. अरवराज गुप्ता व अनसुया या दोघा जणांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळणार, असे सांगत मधु यांना खाते उघडण्यास सांगितले. नोंदणीसाठी 1 लाख 73 हजार रुपये फोन पे च्या माध्यमातून भरून घेतले. त्यांना विश्वास बसावा यासाठी 4 लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा दाखविले. व्यवहार सरळ आहे, असा विश्वास बसताच मधु यांनी 10 लाख 93 हजार रुपये जमा केले. मात्र, त्याचा परतावा त्यांना मिळाला नाही.