For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मध्यप्रदेशात फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 11 ठार

06:02 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
मध्यप्रदेशात फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट  11 ठार
Advertisement

हरदा येथे भीषण दुर्घटना : 60 जण जखमी

Advertisement

वृत्तसंस्था/ हरदा

मध्यप्रदेशच्या हरदा येथील फटाक्यांच्या कारखान्यत झालेल्या स्फोटानंतर भीषण आग लागली. या स्फोटात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या दुर्घटनेची माहिती केंद्र सरकारला देत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. तसेच मुख्यमंत्री यादव यांनी पीडित कुटुंबांना 4 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा करत जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे सांगितले आहे.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील हरदा येथे झालेल्या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. मध्यप्रदेशच्या हरदा येथे फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याने दु:खी आहे. स्थानिक प्रशासन सर्व प्रभावित लोकांना मदत करत आहे. मृतांच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफमधून 2 लाख रुपये दिले जाणार आहेत. जखमींना 50 हजार रुपयांची मदत केली जाणार असल्याचे मोदींनी नमूद केले आहे.

फटाक्यांच्या कारखान्यात भडकलेली आग आसपासच्या घरांमध्ये देखील फैलावली आहे. सुमारे 50 घरांना आगीने वेढले होते. याचमुळे या स्थितीवर नियंत्रण मिळविणे अवघड ठरले आहे. अग्निशमन दलाची वाहने आगीवर मंगळवारी रात्रीपर्यंत नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत होती. नजीकच्या जिल्ह्यांमधूनही अग्निशमन दलाच्या वाहनांना पाचारण करण्यात आले आहे. अनेक कामगार अद्याप फटाक्यांच्या कारखान्यात अडकून पडले असल्याचे बोलले जात आहे.

दुर्घटनेतील जखमींना होशंगाबाद आणि भोपाळ येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. एसडीआरएफचे पथक अतिरिक्त महासंचालकांच्या नेतृत्वाखाली बचावकार्य करत असल्याची माहिती राज्याचे मंत्री उदयप्रताप सिंह यांनी दिली आहे.

Advertisement
Tags :

.