For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीत इमारत कोसळून 11 ठार

06:58 AM Apr 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीत इमारत कोसळून 11 ठार
Advertisement

मध्यरात्री चार मजली इमारत कोसळली : मृतांमधील 8 जण एकाच कुटुंबातील : अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीतील मुस्तफाबाद परिसरात शुक्रवारी मध्यरात्री 2.30 वाजता एक चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 12 हून अधिक लोक जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या पाच जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. 20 वर्षे जुनी चार मजली इमारत कोसळल्यानंतर शनिवारी सायंकाळपर्यंत बचावकार्य सुरू होते.

Advertisement

अपघातानंतर एनडीआरएफ आणि दिल्ली पोलिसांच्या पथकांनी जखमींना जीटीबी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीत 22 लोक होते. त्यापैकी इमारतीचा मालक तहसीन आणि त्याच्या कुटुंबातील सहा सदस्यांचाही मृत्यू झाला. यामध्ये 3 महिला आणि 4 मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात 22 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. एनडीआरएफ आणि दिल्ली पोलिसांचे पथक दिवसभर घटनास्थळी बचावकार्यात गुंतले होते.

दिल्लीतील हवामान शुक्रवारी रात्री अचानक बदलले. मुसळधार पाऊस आणि वादळामुळे अनेक भागात नुकसान झाले. याच कारणामुळे मुस्तफाबादमधील इमारतही कोसळल्याची माहिती देण्यात आली. याचदरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा एका घराच्या पडझडीची माहिती मिळाली. जेव्हा आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा आम्हाला आढळले की संपूर्ण इमारत कोसळली होती. तसेच लोक ढिगाऱ्यात अडकले होते, अशी माहिती विभागीय अग्निशमन अधिकारी राजेंद्र अटवाल यांनी दिली.

ही दुर्घटना एमसीडीच्या निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचाराचा परिणाम असल्याचा आरोप मुस्तफाबादचे आमदार मोहन सिंग बिश्त यांनी केला आहे. अलिकडेच ही इमारत धोकादायक घोषित केली होती आणि एलजी आणि एमसीडीलाही इशारा दिला होता. मुस्तफाबादमध्ये अनेक बेकायदेशीर आणि जीर्ण इमारती असल्याचा दावाही त्यांनी केला.

गेल्या आठवड्यातही अशीच घटना

यापूर्वी 11 एप्रिल रोजी दिल्लीतील मधु विहारमध्ये एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळून दुर्घटना घडली होती. ही घटना मधु विहार पोलीस ठाण्याजवळ घडली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले होते.

Advertisement
Tags :

.