जॉर्जियात वायू गळतीमुळे 11 भारतीयांचा मृत्यू
रेस्टॉरंटमधील दुर्घटना : दुतावासाकडून दुजोरा
तिबिलिसी
जॉर्जियातील गुडौरी येथील एका रिसॉर्टमध्ये सोमवारी 11 भारतीयांसह 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सोमवारी रात्री समोर आली. भारतीय दूतावासाने याला दुजोरा दिला आहे. सर्वजण रिसॉर्टच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत झोपले होते. त्यानंतर कार्बन मोनॉक्साईड गळतीमुळे श्वास गुदमरल्याने त्यांना प्राण गमवावे लागल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. हे सर्वजण रिसॉर्टमध्ये काम करत होते. सध्या मृत्यू झालेल्यांची ओळख उघड करण्यात आलेली नाही.
प्राथमिक तपासात पोलिसांना कोणाच्याही अंगावर कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. पोलिसांनी मृतदेह सुरक्षित ठेवले आहेत. लवकरच त्यांचे पार्थिव भारतात पाठवण्याच्या दृष्टीने दुतावास अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. जॉर्जिया पोलिसांनी या प्रकरणी फौजदारी संहितेच्या कलम 116 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी निष्काळजीपणामुळे मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच रिसॉर्ट मॅनेजर आणि इतर कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे. विषारी वायूमुळे सर्वांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतांच्या शरीरावर जखमेच्या किंवा मारहाणीच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. सध्या फॉरेन्सिकसह पोलिसांची दोन पथके या प्रकरणाच्या तपासात गुंतलेली आहेत. यासंदर्भात जॉर्जियाच्या गृह मंत्रालयाने एक निवेदन जारी करून प्राथमिक तपासात मृतांच्या शरीरावर जखमेच्या किंवा मारहाणीच्या कोणत्याही खुणा नाहीत, असे म्हटले आहे.