आरसीबीच्या विजयोत्सवाला गालबोट
बेंगळूरमधील चिन्नास्वामी क्रीडांगणाबाहेर चेंगराचेंगरीत 11 चाहत्यांचा मृत्यू : 33 जण जखमी : दुर्घटनेला ढिसाळ नियोजन कारणीभूत
बेंगळूर : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर (आरसीबी) संघाने पंजाब किंग्स संघाला पराभूत करत 18 वर्षांनंतर पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या विजयानंतर बुधवारी बेंगळुरात दाखल झालेल्या आरसीबी संघाच्या विजयोत्सवाला गालबोट लागले. बेंगळूरमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित विजयोत्सव सोहळ्यादरम्यान भीषण चेंगराचेंगरी झाल्याने 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये एक बालक, सात पुरुष, तीन महिलांचा समावेश आहे. तसेच 33 जण जखमी झाले असून त्यातील 11 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
मृतांच्या कुटुंबीयांचा इस्पितळाबाहेर आक्रोश
खेळाडूंना पाहण्यासाठी अतिउत्साही चाहते बॅरिकेड्स, संरक्षक भिंत ओलांडून आत शिरत होते. तर काहीजण झाडावर चढून बसले होते. यावेळी खाली पडून अनेकजण जखमी झाले. आरसीबी संघाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी आलेल्या चाहत्यांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्याने आनंदावर विरजण पडले. घटनास्थळी विदारक दृष्य दिसून आले. मृत्यूचे वृत्त समजताच इस्पितळाबाहेर मृतांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला.
आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहते भान हरपून अनेकजण तेथे दाखल झाले. स्टेडियमचे गेट क्र. 18, 19 आणि 20 उघडताच अचानक धक्काबुक्की सुरू झाली. यावेळी अनेकजण एकमेकांवर पडले. त्यातील काहीजण गुदमरल्याने अत्यवस्थ झाले.
आरसीबी संघ बेंगळुरात येत असल्याचे समजताच बेंगळूर आणि उपनगरातून हजारो चाहते विधानसौध आणि चिन्नास्वामी क्रीडांगणाबाहेर जमा होत होते. दुचाकी, चारचाकी, मेट्रो रेल्वे, बस व इतर वाहनांमधून चाहते क्रीडांगणामध्ये येत होते. क्रीडांगणाजवळील मेट्रो रेल्वे स्टेशनवरही चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीला नियंत्रित करणे आवाक्याबाहेर होते. त्यामुळे सायंकाळी 4:30 वाजल्यापासून विधानसौधजवळील कब्बनपार्क आणि डॉ. बी. आर. आंबेडकर मेट्रो रेल्वेस्थानकांवर रेल्वे बंद करण्यात आल्या.
मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत जाहीर
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रात्री 8 वाजता ‘कावेरी’ या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच जखमींवर मोफत उपचार करणार असल्याचे सिद्धरामय्यांनी सांगितले.
काँग्रेस सरकारच्या बेजबाबदारपणामुळे चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. अनेकांना जीव गमवावे लागले. गर्दी नियंत्रणासाठी कोणतेही उपाय करण्यात आले नव्हते. कोणतीही मूलभूत व्यवस्था केली नव्हती. निष्पाप लोकांचे बळी जात असताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार क्रिकेटपटूंसोबत रिल शूट करण्यात आणि प्रचारात व्यस्त होते. काँग्रेस सरकारसाठी ही लाजिरवाणी बाब आहे. काँग्रेस सरकारचे हात रक्ताने माखलेले आहेत, अशी परखड टीका राज्य भाजपने ‘एक्स’ पोस्टद्वारे केली आहे.
आरसीबीच्या विजयोत्सावावेळी घडलेल्या घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रॉयल चॅलेंजर्स व्यवस्थापनाने बेंगळुरात खुल्या बसमधून रोड शो करण्याचा निर्णय घेतला होता. पण रोड शो झाला नाही. सरकारने विधानसौध आवारात खेळाडूंचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला. पावसामुळे 15 मिनिटांत हा कार्यक्रम पार पडला. परंतु, चिन्नास्वामी स्टेडियममधील कार्यक्रम आम्ही आयोजित केला नव्हता, असे सरकारने सांगितले आहे. आरसीबी संघ बेंगळुरात येत असल्याने चाहत्यांची गर्दी होणार असल्याचे स्पष्ट असताना सरकारने त्यादृष्टीने केलेली व्यवस्था तोकडी असल्याचे दिसून आले आहे.
चेंगराचेंगरीच्या घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त करताना जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी कामना केली आहे. पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘बेंगळूरमधील ही दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. या दु:खद क्षणी, ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींच्या जलद पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो.’ असे म्हटले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही चेंगराचेंगरीच्या घटनेवर शोक व्यक्त करताना बेंगळूरमधील स्टेडियममध्ये घडलेली घटना दु:खद आणि हृदयद्रावक असल्याचे स्पष्ट केले. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना आणि जखमींच्या जलद पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करते, असेही त्या पुढे म्हणाल्या.
मॅजिस्ट्रेटमार्फत चौकशी करणार!
आरसीबीच्या विजयोत्सव साजरा करण्यासाठी क्रिकेट असोसिएशनने कार्यक्रम आयोजित केला होता. सरकारने पोलीस सुरक्षा पुरविली होती. अपेक्षेपेक्षा अधिक जण जमल्याने दुर्घटना घडली आहे. यावेळी 2 लाखांपेक्षा अधिक लोक उपस्थित होते. मात्र, स्टेडियमची क्षमता 35 हजार इतकी होती. चेंगराचेंगरी प्रकरणाची मॅजिस्ट्रेटमार्फत चौकशी करण्यात येईल.
- सिद्धरामय्या, मुख्यमंत्री