बोलेरो कालव्यात कोसळून 11 भाविकांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील गोंडामधील दुर्घटना : मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांचा समावेश
वृत्तसंस्था/ गोंडा
उत्तर प्रदेशातील गोंडा येथे रविवारी सकाळी झालेल्या एका रस्ते अपघातात 11 भाविकांचा मृत्यू झाला. एक वेगवान बोलेरो नियंत्रण गमावल्यामुळे सरयू कालव्यात कोसळून ही दुर्घटना घडली. मृतांपैकी 9 जण एकाच कुटुंबातील आहेत. या दुर्घटनेत चालकासह 4 जण बचावले असून 10 वर्षांची एक मुलगी अजूनही बेपत्ता आहे. एसडीआरएफ टीम तिचा शोध घेत आहे.
बोलेरोमधील 16 जण पृथ्वीनाथ मंदिरात जलार्पण करण्यासाठी जात होते. अपघात इतका भीषण होता की कार कालव्यात पडल्यानंतर एकही व्यक्ती बाहेर पडू शकली नाही. पावसामुळे कालवा पाण्याने भरला होता. कालव्यात पडताच कार पूर्णपणे बुडाली. तिचे दरवाजे बंद झाले. आत बसलेले लोक बचावासाठी संघर्ष करत राहिले. मात्र, दरवाजे खुले न झाल्याने बोलेरोच्या मागील बाजूला बसलेल्या सर्व प्रवाशांना प्राण गमवावे लागले.
गाडी नियंत्रणाबाहेर जाऊन कालव्यात पडू लागली तेव्हा चालकाने दरवाजा उघडत उडी मारली. त्याचदरम्यान चालकाशेजारी पुढच्या सीटवर बसलेले दोघेही बाहेर आले. मधल्या सीटवर उभी असलेली पिंकी नामक एक मुलगीही चालकाच्या बाजूच्या दरवाजामधून बाहेर पडली. त्यानंतर बोलेरो कालव्यात कोसळल्यानंतर ती पूर्णपणे पाण्यात बुडाल्यामुळे आत अडकलेल्यांपैकी कोणाचाही जीव वाचू शकला नाही.
भजन गात असतानाच...
रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास इटियाथोक पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, अपघातावेळी गाडीचा वेग ताशी 60 किमीहून अधिक होता. अपघातातून बचावलेली पिंकी ही मुलगी आपल्या नातलगांच्या मृत्यूमुळे दु:खसागरात बुडाली आहे. आम्ही सर्वजण मंदिरात जात होतो. अपघात झाला तेव्हा आम्ही भजन गात होतो. अचानक आमची गाडी घसरून कालव्यात पडली. त्यानंतर काय झाले ते मला आठवत नाही, असे तिने स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करतानाच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली. या कठीण काळात सरकार पीडित कुटुंबांसोबत उभे आहे. अपघातग्रस्तांना शक्य तितकी मदत केली जाईल, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या दुर्घटनेची गंभीर दखल घेत अपघातग्रस्तांना योग्य मदत करण्याची सूचना संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली आहे.
स्थानिकांची अपघातस्थळी धाव
अपघात झाला त्याठिकाणी जवळच गावकरी होते. बोलेरो कालव्यात पडताना पाहून त्यांनी प्रवाशांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारत शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र, बोलेरोचे दरवाजे उघडू शकले नाहीत. त्यांनी दोरी बांधून बोलेरो किनाऱ्यावर आणली, तेव्हाच गाडीचा काही भाग बाहेर आला. मोठ्या कष्टाने त्यांनी खिडकीच्या काचा फोडून एक-एक करून प्रवाशांना बाहेर काढले. तोपर्यंत सर्वांचा मृत्यू झाला होता.
मृतांमध्ये 6 महिला, 3 मुले
मृतांमध्ये 6 महिला, 2 पुरुष आणि 3 मुले आहेत. सिहगाव येथील प्रल्हादची पत्नी बीना (44), दोन मुली काजल (22), मेहक उर्फ रिंकी (14), प्रल्हादचा भाऊ रामकरण (36), रामकरणची पत्नी अनुसूया (34), मुलगा शुभ (7), मुलगी सौम्या (9), प्रल्हादचा धाकटा भाऊ रामरूपची पत्नी दुर्गेश नंदिनी (35), मुलगा अमित (14) यांचा समावेश आहे. याशिवाय प्रल्हादचे शेजारी रामलाल वर्मा यांची पत्नी संजू (26) आणि बहीण गुडिया उर्फ अंजू (20) यांचाही मृत्यू झाला. प्रल्हादचा एक मुलगा सत्यम आणि एक मुलगी पिंकी या अपघातात जखमी आहेत. शेजारी रामलाल आणि चालक सीतारामन हे देखील जखमी आहेत. रामरूपची एक मुलगी रचना (10) बेपत्ता आहे.