दिल्ली निवडणुकीसाठी ‘आप’चे 11 उमेदवार जाहीर
भाजप-काँग्रेसमधून आलेल्या 6 नेत्यांना तिकीट
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जारी केली आहे. या यादीत 11 जणांची नावे असून यातील 6 नेते हे भाजप अन् काँग्रेसमधून आम आदमी पक्षात प्रवेश केले आहेत. ब्रह्म सिंह तंवर, बीबी त्यागी आणि अनिल झा यांनी अलिकडेच भाजपला रामराम ठोकला होता. तर जुबैर चौधरी, वीर सिंह धींगान आणि सुमेश शौकीन हे काँग्रेसमधून आम आदमी पक्षात दाखल झाले होते. ‘आप’च्या पहिल्या यादीत विश्वासनगर मतदारसंघात दीपक सिंघला यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मटियाला येथे सोमेश शौकीन तर लक्ष्मीनगर येथे बीबी त्यागी हे आम आदमी पक्षाचे उमेदवार असणार आहेत. भाजपमधून बाहेर पडत ‘आप’मध्ये प्रवेश केलेल्या अनिल झा यांना किराडी मतदारसंघाची, बदरपूर येथे रामसिंह, घोंडा मतदारसंघात गौरव शर्मा, करावल नगर येथे मनोज त्यागी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. छतरपूर मतदारसंघात ब्रह्म सिंह तंवर, सीलमपूर येथे जुबैर चौधरी, सीमापुरी येथे वीर सिंह धींगान, रोहतास नगरमध्ये सरिता सिंह यांना पक्षाने संधी दिली आहे.