दोघा चोरट्यांकडून 5 लाखाच्या 11 दुचाकी जप्त
बेळगाव : कित्तूर पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत दुचाकी चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून 5 लाख किमतीच्या 11 दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी मंडलिक सिद्धाप्पा कुरी, सुलेमान रेहमान हवालदार (दोघे रा. देमट्टी, ता. कित्तूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वीरेश बसवराज वारद (मूळचा रा. चिंचवाड ता. खानापूर, सध्या रा. गुरुवार पेठ कित्तूर) यांची घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरी झाली होती. याप्रकरणी त्यांनी कित्तूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. कित्तूर पोलिसांकडून दुचाकीचा तपास करताना अटक करण्यात आलेल्या संशयितांकडे दुचाकी सापडली. यावरून संबंधितांची चौकशी केल्यानंतर विविध ठिकाणी चोरी केलेल्या 11 दुचाकी पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. बैलहोंगलचे डीएसपी रवी डी. नायक, नंदगड पोलीस निरीक्षक व प्रभारी कित्तूर पोलीस निरीक्षक एस. सी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ व पोलीस कर्मचारी जी. जी. हंप्पण्णावर, आर. के. गेजेरी, एस. ए. दफेदार, एन. आर. गळगी, एल. एफ. जंबवाडी, एम. एस. औरादी, के. एस. मधूर आदी कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने सदर कारवाई करण्यात आली आहे.