दहावीचा निकाल उद्या
प्रतिनिधी/ पणजी
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जारी केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, 7 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता दहावीच्या (एसएससी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र) परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे.
एसएससी परीक्षा 1 ते 21 मार्च 2025 दरम्यान गोव्यात 32 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पर्वरी यांच्या देखरेखीखाली ही परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षी एकूण 18 हजार 838 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, ज्यात 9 हजार 280 मुले आणि 9 हजार 558 मुलींचा समावेश आहे.
निकालाच्या दिवशी www.gbshse.in तसेच https://results.gbshsegoa.net या अधिकृत संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय डिजीलॉकर अॅप व संकेतस्थळावरही निकाल पाहता येणार आहे.
मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, 9 एप्रिलपासून शाळांसाठी संयुक्त निकालपत्र संकेतस्थळावरून (https://service1.gbshse.in) उपलब्ध होईल. शाळांसाठी निकाल पुस्तिकासुद्धा अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहेत.
यंदा परीक्षा संपल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत निकाल जाहीर करणे हे मोठे यश मानले जात आहे. सामान्यत: अनेक राज्यांमध्ये निकाल जाहीर करण्यास महिन्याभरापेक्षा जास्त वेळ लागतो. मात्र गोवा बोर्डाने वेगवेगळ्या श्रेणीतील परीक्षार्थींची माहिती, परीक्षा केंद्रांची संख्या आणि अन्य प्रक्रिया वेळेत पार पाडत विक्रमी वेळेत निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया इतक्या वेगात पार पाडणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. या ऐतिहासिक यशामागे गोवा बोर्डाचे अध्यक्ष भगीरथ शेट्यो यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, नियोजन आणि कार्यक्षमतेचा मोठा वाटा आहे.