साखळी ओढल्याने आठ महिन्यात मध्य रेल्वेच्या १०७५ रेल्वेंना फटका
सोलापूर विभागात ३९ घटना; एकूण ७९३ व्यक्तीविरुद्ध नोंदविले गुन्हे: २ लाख ७२ हजारांचा दंड वसूल
सोलापूर प्रतिनिधी
लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या फलाटावरून निघताच १० ते १२ मिनिटे थांबतात आणि पुन्हा सुरू होतात. याचा अनुभव कमी-अधिक प्रमाणात सर्वच रेल्वे प्रवाशांना येतो. या मागील नेमके कारण समोर आले आहे. मध्य रेल्वेवरील १ हजार ७५ तर सोलापूर विभागातील ३९ मेल-एक्स्प्रेसमध्ये आपत्कालीन साखळी ओढण्याचे (अलार्म चैन पुलिंग) प्रमाण वाढले आहे. गेल्या आठ महिन्यांत अर्थात एप्रिल ते नोव्हेंबर पर्यंत प्रवाशांनी रोज साखळी ओढून गाडी थांबवण्याचे प्रकार नोंदवण्यात आले आहेत. तर मध्य रेल्वेच्या पाचही विभागातील 793 व्यक्तीविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यांच्याकडून दोन लाख 72 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. फक्त नोव्हेंबरमध्ये 197 गाड्यांमध्ये चैन ओढण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे १ हजार ७५ गाड्यांना फटका बसत आहे. प्रवासी रेल्वे गाड्यांना उशीर होत आहे. त्यामुळे याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे.
नेमके काय होते?
- स्थानकावरून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांबाबत हा प्रकार घडत आहे.
- एकदा साखळी ओढली तर एका रेल्वेला किमान ८ ते १० मिनिटांचा उशीर होतो.
- एका रेल्वेला उशीर झाला तर त्याच्या पाठीमागे येणाऱ्या आणखी रेल्वेला देखील त्याचा फटका बसतो.
- आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांची गस्त असली तरी प्रवासी त्यांना न जुमानता साखळी ओढून रेल्वे थांबवीत आहे.
- मागील आठ महिन्यात साखळी ओढण्याच्या सुमारे १ हजार ७५ घटना घडल्या आहेत.
- याचा थेट फटका १ हजार ७५ प्रवासी गाड्यांना बसला आहे.
प्रवासी काय सांगतात कारणे?
प्रवाशांनी डब्यातील साखळी ओढल्यावर रेल्वे थांबते. जर त्यावेळी फलाटावर आरपीएफ असेल तर तो संबंधित डब्यात जाऊन साखळी ओढलेल्या प्रवाशाचा शोध घेतो. प्रवासी सापडल्यास त्याला ताब्यात घेतले जाते. यावेळी तो विविध कारणे सांगतो. यात ते म्हणतात, प्रवासी खाली राहिला, सामान फलाटावर विसरले, मोबाईल खाली पडला. मात्र, हे सर्व गैरलागू असल्याने आरपीएफ त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत आहे.
अशी आहे कारवाईची तरतूद
- ‘चेन पुलिंग’च्या घटना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कारवाईत नुकतेच बदल केले आहेत.
- अनावश्यक ‘चेन पुलिंग’ केल्यास रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार कारवाई केली जाते.
- याबद्दल संबंधिताकडून पाचशे ते एक हजार रुपयांचा दंड वसूल केला जातो.
- ‘चेन पुलिंग’चा प्रकार पाहून मोठी कारवाई करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.
- तीन महिने शिक्षेचीदेखील तरतूद असून, गुन्हा दाखल झाल्यास तरुणांना सरकारी नोकरीत अडथळे येऊ शकतात.
एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ पर्यंत ‘चेन पुलिंग’च्या घटना
मुंबई विभागात ३४४, पुणे विभागात ९६ भुसावळ मध्ये ३५५, नागपूर विभागात २४१ तर सोलापूर मध्ये ३९ अशा एकूण १०७५ रेल्वेंना फटका बसला आहे