इस्रायलच्या गाझा हल्ल्यात 104 ठार
हमासकडूनही शस्त्रसंधीचे उल्लंघन, संघर्ष वाढणार
वृत्तसंस्था / तेल अवीव
अमेरिकेने आणि इतर काही देशांनी घडवून आणलेली इस्रायल आणि हमास यांच्यातील शस्त्रसंधी अल्पजीवी ठरणार, हे भाकित खरे ठरताना दिसत आहे. हमासने शांतता करारातील अटींचे पालन न केल्याने इस्रायलने गाझा पट्टीवर बुधवारी सकाळी केलेल्या जोरदार हल्ल्यात 104 जण ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या हल्ल्याला सर्वस्वी हमास उत्तरदायी आहे, असा आरोप इस्रायलने केला असून हमासने इस्रायलला त्यासाठी जबाबदार धरले आहे.
शस्त्रसंधीचे उल्लंघन करत हमासने मंगळवारी केलेल्या हल्ल्यात गाझापट्टीत एका इस्रायली सैनिकाचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा अमेरिकेनेही निषेध केला होता आणि इस्रायलला स्वसंरक्षणासाठी हल्ला करण्याचा अधिकार असल्याचे वक्तव्य केले होते. आपल्या सैनिकाला मारण्यात आल्याने संतप्त झालेले इस्रायलचे नेते बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझावर हल्ला करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार बुधवारी इस्रायलयच्या युद्धविमानांनी गाझापट्टीच्या मध्यमागावर जोरदार बाँबवृष्टी करुन अनेक इमारती नष्ट केल्या. या हल्ल्यात 100 हून अधिक जण ठार झाले. या हल्ल्यानंतर हमासने इस्रायली अपहृतांचे मृतदेह इस्रायलच्या आधीन करण्याची प्रक्रिया थांबविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परिणामी, शस्त्रसंधीचे आता काय होणार, याविषयी आंतरराष्ट्रीय वर्तुळात गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
हमासची निंदा
इस्रायलच्या सरंक्षणमंत्र्यांनी हमासची निंदा केली आहे. हमासला शस्त्रसंधी नको आहे. त्यांचा हिंसाचार आणि रक्तपातावरच विश्वास आहे. इस्रायलने आतापर्यंत शस्त्रसंधीचे यथायोग्य पालन केले आहे. मात्र, हमासने इस्रायलच्या सैनिकांवर हल्ले केल्यास आम्ही स्वस्थ बसणार नाही. हमासला प्रत्युत्तर दिले जाईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. अमेरिकेनेही या संदर्भात इस्रायलचे समर्थन केले आहे.
50 हून अधिक बालके मृत्युमुखी
इस्रायलच्या हल्ल्यात गाझापट्टीतील 50 हून अधिक बालके ठार झाल्याचा दावा हमासने केला आहे. तसेच आणखी किमान 50 नागरिक ठार झाले असून 300 हून अधिक जखमी झाले आहेत, असेही हमासचे म्हणणे आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यांचे स्वरुप अधिक व्यापक होते. उत्तर, मध्य आणि दक्षिण गाझामध्ये अनेक स्थानी बाँबफेक करण्यात आली. निवासी इमारती, शाळा आणि सरकारी आस्थापनांवर हल्ले करण्यात आले. गाझातील साब्रा उपनगरालाही लक्ष्य करण्यात आले होते. बुरेज नागरी वस्तीतही अनेक जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेचा विश्वास
इस्रायल आणि हमास यांच्यात शस्त्रसंधीनंतरही संघर्ष झालेला असला, तरी तो हाताबाहेर जाणार नाही. तसेच शस्त्रसंधी आजही मोठ्या प्रमाणात पाळली जात आहे. शस्त्रसंधीचे दोन्ही पक्ष शस्त्रसंधीच्या संदर्भात गंभीर आहेत. काही कारणांमुळे अपवादात्मक परिस्थितीत संघर्षाचा भडका उडू शकतो. तथापि, आम्ही स्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असे व्हाईट हाऊसच्या प्रसिद्धी विभागाने स्पष्ट केले आहे.
हमासला वठणीवर यावेच लागेल
ही शस्त्रसंधी केवळ इस्रायल आणि हमास यांच्यातील नाही. इतर अनेक महत्वाचे देश अंतर्भूत आहेत. हमास हा या व्यापक शस्त्रसंधीचा आणि शांतता कराराचा एक छोटा भाग आहे. हमासने इस्रायलच्या सैनिकांवर किंवा आस्थापनांवर हल्ला केल्यास इस्रायलला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे आणि तसे प्रत्युत्तर त्या देशाने दिले, तर ते योग्यच आहे. हमासने शस्त्रसंधी नियमांचा भंग केल्यास त्याला धडा शिकविला जाईल आणि अखेरीस त्याला वठणीवर यावेच लागेल. अन्यथा, त्याला संपावे लागणार आहे. करारातील कोणत्याही पक्षाला करारभंग करून चालणार नाही, अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली.