टाटा पॉवरला 1017 कोटीचा नफा
नवी दिल्ली : टाटा समूहातील ऊर्जा क्षेत्रातील कंपनी टाटा पॉवरने आर्थिक वर्ष 2024 चा दुसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. सदरच्या तिमाहीत कंपनीने एकत्रित निव्वळ नफ्यात 9 टक्के वाढ दर्शवली असून 1017 कोटी रुपये इतका नफा प्राप्त करण्यात कंपनीला यश आले आहे. मुख्य व्यवसायाने चांगली प्रगती दर्शवल्याने महसुलात वाढ नोंदवण्यात आली आहे. सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत एकुण कमाईतही चांगली वाढ नोंदवली आहे. या अवधीत कंपनीने 16,029 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. जे एक वर्षामागे याच अवधीत 14,181 कोटी रुपये इतके होते. करपश्चात नफा कंपनीने 84 टक्के इतका मुख्य व्यवसायांच्या चांगल्या कामगिरीमुळे कमावला आहे. टाटा पॉवरने स्वच्छ ऊर्जा कार्यप्रणालीअंतर्गत आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत 5500 मेगावॅट ऊर्जा उत्पादीत केली आहे.
समभाग 2 टक्के वधारला
गुरुवारी शेअरबाजारात या बातमीनंतर कंपनीच्या समभागावर सकारात्मक परिणाम दिसून आला. कंपनीचा समभाग गुरुवारच्या सत्रात 2 टक्के इतका वाढत 254 रुपयांवर बंद झाला होता.