1 हजार वर्षे जुने दुर्लभ नाणे प्राप्त
नॉर्वेमध्ये अत्यंत दुर्लभ नाण्याचा शोध लागला असून यात येशू ख्रिस्तांचे चित्र कोरलेले आहे. या नाण्याचा शोध मेटल डिटेक्टरिस्टद्वारे लावण्यात आला आहे. हे नाणे सुमारे एक हजार वर्षापूर्वी बीजान्टिन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टेंटिनोपलमध्ये तयार करण्यात आले होते. हे नाणे सोन्याने तयार करण्यात आलेले आहे. इनलँडेट काउंटीपासून 1600 मैल अंतरावर या नाण्याचा शोध लागला आहे. एका मेटल डिटेक्टरिस्टची नजर नॉर्वेच्या वेस्ट्रे स्लिड्रेमध्ये पर्वतीय भागातील या नाण्यावर पडली होती. हे नाणे म्हणजे नॉर्वेसाठी दुर्लभ शोध असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
अतिदुर्लभ असलेले हे नाणे सोन्याचे असून त्याच्या दोन्ही बाजूला चित्र आहे. एकाबाजूला येशू ख्रिस्त हे बायबल हातात पकडून असल्याचे चित्र आहे. तर दुसऱ्या बाजूला बीजान्टिन सम्राट बेसिल द्वितीय आणि कॉन्स्टेंटाइन सातवा यांना दर्शविण्यात आले आहे. हे दोघेही भाऊ होते आणि त्यांनी एकत्र शासन केले होते.
नाण्याच्या ज्या बाजूला येशू ख्रिस्त यांचे चित्र कोरण्यात आले आहे, त्याच्या खाली लॅटिन भाषेत एक वाक्य लिहिले गेले आहे. याचा अर्थ ‘येशू ख्रिस्त हे शासन करणाऱ्यांचे राजे आहेत’ असा होतो. तर सम्राटांचे चित्र कोरण्यात आलेल्या बाजूला ग्रीक भाषेत एक वाक्य लिहिले असून याचा अनुवाद ‘बेसिल आणि कॉन्स्टेंटाइन रोमनचे सम्राट आहेत’ असा होतो.
नाणे बेसिल आणि कॉन्स्टेंटाइनच्या शासनकाळात तयार करण्यात आले होते. बहुधा 977 आणि 1025 दरम्यान ते तयार करण्यात आले असावे. हे नाणे नॉर्वेत कसे पोहोचले याचा शोध आता तज्ञ घेत आहेत. हे नाणे 1045-1066 पर्यंत नॉर्वेचे राजे राहिलेले हेराल्ड द रुथलेस यांचे होते असाही दावा करण्यात येत आहे. हेराल्ड हा राजा होण्यापूर्वी बीजान्टिन सम्राटाचा सुरक्षारक्षक म्हणून काम करायचा. सम्राटाच्या मृत्यूनंतर सुरक्षारक्षकांकडून महाल लुटण्याची प्रथा होती. सुरक्षा रक्षक म्हणून हेराल्डच्या काळात 3 सम्राटांचा मृत्यू झाला होता.