घरात मिळाली 100 वर्षे जुनी पत्रं
जाळण्याचा झाला होता प्रयत्न
अनेकदा जगापासून दूर एखाद्या गुहेत किंवा समुद्रकिनारी दशकांपेक्षा जुनी अशी गोष्ट मिळते, जी चकित करून टाकणारी असते. याचबरोबर जुन्या घरांमध्ये देखील इतिहास सांगणारी गोष्ट मिळत असते. अलिकडेच इंग्लंडच्या एका दांपत्याला स्वत:च्या घराच्या नुतनीकरणावेळी 100 वर्षे जुनी गोष्ट सापडली आहे.
घराच्या लिव्हिंग रुममध्ये फायर प्लेसच्या मागे पत्रांचा ढीग पडला होता. लॉरा अणि जेसन लॅमोनबी पार्करने मार्च 2023 मध्ये 100 वर्षे जुने घर खरेदी केले होते. चेशायर येथील घराचे नुतनीकरण करण्याचे काम त्यांनी हाती घेतले होते. लिव्हिंग रुमची चिमणी तोडताच जुन्या पत्रांना पाहून ते दंग झाले.
बहुधा या पत्रांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु चुकून ही पत्रं फायरप्लेसच्या मागे पडली असावीत असे लॉराने म्हटले आहे. ही पत्रं 1934, 1935, 1936 आणि 1937 मधील आहेत. तसेच सर्व पंत्र मिस रोडा टेलर यांच्यासाठी लिहिली गेली होती.
दांपत्याने ही पत्रं मिळाल्यावर जुन्या मालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडे या नावाच्या महिलेविषयी कुठलीच माहिती नव्हती. टेलर या महिलेसंबंधी माहिती मिळाली तर तिच्या नातेवाइकांना ही पत्रं सोपविण्याची अपेक्षा लॅमोनबी-पार्कर्स करत आहेत.