100 वर्षांचा वर, 102 वर्षांची वधू
सर्वात वृद्ध नवविवाहित दांपत्य
प्रेमाला कुठलेच वय नसते, जर दोन व्यक्ती प्रेम करत असतील तर ते कुठल्याही वयात परस्परांचे सोबती होऊ शकतात. अमेरिकेतील एका जोडप्याने हे सिद्ध करून दाखविले आहे. या जोडप्याने विवाह करत एक विश्वविक्रम नोंदविला आहे. हे दोघेही आता जगातील सर्वात वृद्ध नवविवाहित दांपत्य ठरले आहे. दोघांचे वय एकत्र केले तर 200 वर्षांपेक्षा अधिक होते.
गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने स्वत:च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकौंटवर या दांपत्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या जोडप्यातील वर हा 100 वर्षांचा आहे. तर नववधू 102 वर्षांची आहे. बर्नार्ड लिटमॅन आणि मार्जोरी फिटरमॅन हे दोघेही अमेरिकेच्या फिलाडेल्फिया येथे राहतात. दोघेही एका ओल्ड एज होममध्ये वास्तव्यास आहेत.
9 वर्षांपूर्वी झाली भेट
या दोघांची भेट सुमारे 9 वर्षांपूर्वी एका कॉस्ट्यूम पार्टीत झाली होती. पाहताक्षणी दोघेही प्रेमात पडले होते. तर चालू वर्षी दोघांनी विवाह केला आहे. बर्नी आणि मार्जोरी यांनी सुखी जीवन व्यतित केले असून दोघांनी स्वत:च्या जोडीदारांसोबत सुमारे 60 वर्षे संसार केला होता. परंतु दोघांच्याही जोडीदाराचा मृत्यू झाला होता. आश्चर्याची बाब म्हणजे दोघांनीही पेंसिलवेनिया विद्यापीठात शिक्षण घेतले होते, पण दोघेही तेथे कधीच परस्परांना भेटले नव्हते. वयाच्या या टप्प्यात दोघेही परस्परांना भेटले, प्रेमात पडले आणि आता विवाह केला आहे. बर्नी एक इंजिनियर होते. तर मार्जोरी या शिक्षिका होत्या.
विवाहात कुटुंबीय सामील
बर्नार्ड लिटमॅन यांची नात सारा सिकरमॅनने या विवाहासंबंधी माहिती दिली आहे. बर्नार्ड स्वत:ला सक्रीय ठेवल्यानेच दीर्घायुष्य मिळाल्याचे सांगतात. तर बटरमिल्क पित असल्याने आयुष्य वाढल्याचे मार्जोरी यांचे सांगणे आहे. दोघांच्या विवाहात त्यांच्या कुटुंबातील लोकही सामील झाले.