दक्षिण आफ्रिकेतील खाणीत 100 कामगारांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ केपटाउन
दक्षिण आफ्रिकेत सोन्याच्या खाणीत अडकून पडलेल्या 100 हून अधिक कामगारांचा मृत्यू झाला आहे. खाणीत दोन महिन्यांपासून 400 हून अधिक मजूर अडकून पडले होते. हे सर्व मजूर खाणीतून अवैध स्वरुपात सोने मिळवू पाहत होते. घटनास्थळी मदत-बचावासाठी स्पेशल मायनिंग रेस्क्यू टीमला पाठविण्यात आले आहे. 13 मृतदेह हाती लागले असून अनेक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.
वाचविण्यात आलेल्या मजुरांकडून एक सेलफोन मिळाला असून त्यात 2 व्हिडिओ होते, या व्हिडिओंमध्ये अनेक मजुरांचे मृतदेह पॉलीथीनमध्ये गुंडाळण्यात आल्याचे दिसून येते. खाणींमध्ये काम करणाऱ्या मजुरांशी निगडित सामाजिक संस्था मायनिंग अफेक्टेड कम्युनिटीज युनायटेड इन अॅक्शननुसार नोव्हेंबर महिन्यात पोलिसांनी अवैध खाणकामाच्या विरोधात कारवाई सुरू केली होती. पोलिसांन या खाणीला बंद करण्याचा प्रयत्न केला होता. याकरता मजुरांना खाणीबाहेर पडण्याची सूचना करण्यात आली होती. अटकेच्या भीतीने मजुरांनी खाणीतून बाहेर पडण्यास नकार दिला होता.
मजुरांनी नकार दिल्यावर पोलिसांनी खाणीत उतरण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी वापरण्यात येणारे दोरखंड हटविले होते. यानंतर मजूर खाणीत अडकून पडले होते. खाणीतील संकटानंतर बचावपथकाने एक पिंजरा तयार केला असून तो खाणीत 3 किलोमीटर खोलवर उतरविला जात आहे. या पिंजऱ्याच्या मदतीने जिवंत असलेल्या लोकांना सर्वप्रथम बाहेर काढले जात आहे.