लघु उद्योगांसाठी 100 टक्के कर्ज
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती : 2 फेब्रुवारीपासून हिवाळी अधिवेशन,दीनदयाळ योजना विमा मर्यादा वाढणार
पणजी : सूक्ष्म व लघु उद्योगांना आता 100 टक्के बिनव्याजी कर्ज देण्यासाठी गोवा मुख्यमंत्री सरल उद्योग सहाय्य योजनेला राज्य मंत्रिमंडळाने काल गुरुवारी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली. या योजनेचा लाभ घेऊ पाहणाऱ्या छोट्या उद्योगांना बँक ऑफ इंडियाकडून (एसआयडीबीआय) कर्ज घ्यावे लागेल. अनुदान खर्चाच्या 75 टक्के व्याजाचा भार (एसआयडीबीआय) आणि 25 टक्के व्याजाचा भार गोवा सरकार उचलेल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पर्वरी येथील मंत्रालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील विविध निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील छोटे उद्योग टिकावेत आणि वाढावेत हा सरकारचा मुख्य हेतू आहे. छोट्या उद्योगांना सरकारने मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला आहे. गत विधानसभा अधिवेशनात सूक्ष्म आणि लघु उद्योsगांना सरकारने भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले होते. आता हे आश्वासन पूर्णत्वास येणार आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 फेब्रुवारीपासून
गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहे. सत्राचा कालावधी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरवला जाईल. अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण, मुख्यमंत्र्यांचे अर्थसंकल्प सादरीकरण यांचा समावेश असेल.
आरोग्य विमा मर्यादा वाढणार
देशातील सर्व राज्यांत गोमंतकीय जनतेला उपचार घेता यावेत, या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे दीनदयाल स्वास्थ्य सेवा योजनेत (डीडीएसएसवाय) येत्या एक ते दोन महिन्यांत बदल करण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत उपचार घेण्यासाठी आरोग्य विम्याची मर्यादा वाढविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
‘आभा’ डीडीएसएसवायला जोडणार
आयुष्मान भारत ही आरोग्य योजना देशात केंद्र सरकारमार्फत राबविली जाते. तिच्याशी दीनदयाल स्वास्थ्य सेवा योजना जोडण्यात येणार आहे. 14 अंकी आयुष्मान भारत आरोग्य खाते (आभा) क्रमांक तयार केला जाईल आणि सर्व लाभार्थ्यांच्या डीडीएसएसवाय कार्डांशी लिंक केला जाईल. आयुष्मान भारतचा क्रमांक किंवा ते कार्ड वापरून देशभरात कोठेही नागरिकांच्या आरोग्य नोंदी मिळवता येतात. गोवा सरकार त्यादृष्टीने नागरिकांसाठी आयुष्मान भारत आरोग्य योजनेचे ओळखपत्र तयार करत आहे. https://abha.abdm.gov.in/abha/v3/register या पोर्टलवर नोंदणी करून नागरिक त्यांचे आयुष्मान भारत ओळखपत्र व क्रमांक तयार करू शकतात, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगतिले.
पर्वरी उ•ाणपूल 2 वर्षांत होणार पूर्ण
पर्वरी येथील प्रस्तावित उ•ाणपुलाचे काम येत्या 2 वर्षांत पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. एकूण 641 कोटी ऊपयांच्या या उ•ाणपुलाची पायाभरणी केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज शुक्रवारी सायंकाळी होणार आहे. नवीन झुआरी पुलाच्या दुसऱ्या लेनचे उद्घाटन संध्या. 5.30 वाजता गडकरी करतील. तसेच पुलाच्या वरच्या फिरत्या रेस्टॉरंटची पायाभरणीही ते करणार आहेत.
‘अ’ व ‘ब’ गट पदांसाठी कोकणी अनिवार्य
‘अ’ व ‘ब’ गट पदांसाठी कोकणी अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. आर्किटेक्चर, अभियांत्रिकी इत्यादी व्यावसायिक महाविद्यालयांमधील प्राध्यापक आणि आरोग्य सेवांमधील सल्लागारांच्या पदांना कोकणी अनिवार्य राहणार नसून, इतर सर्व सरकारमधील खात्यात नोकरी मिळविताना ‘अ’ व ‘ब’ गटातील पदांसाठी कोकणी भाषेचे ज्ञान आवश्यक करण्यात आले आहे.