हिजबुल्लाहचे 100 रॉकेट लाँचर्स नष्ट
इस्रायलकडून एअरस्ट्राइक : दक्षिण लेबनॉनमध्ये सलग तिसऱ्या दिवशी प्रचंड हानी
वृत्तसंस्था/ तेल अवीव
लेबनॉनमध्ये सलग तीन दिवसांपासून हल्ले दिसून येत आहेत. मंगळवारी पहिला पेजर अटॅक झाला, तर बुधवारी तेथे वॉकी-टॉकीमध्ये स्फोट झाले. तर गुरुवारी इस्रायलच्या वायुदलाने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या तळांवर बॉम्ब पाडविले आहेत. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलकडून अनेक हल्ले करण्यात आले आहेत. 7 ऑक्टोबर रोजी गाझा युद्धाच्या प्रारंभानंतर हिजबुल्लाहवरील हा सर्वात घातक बॉम्बवर्षाव होता.
इस्रायलच्या लढाऊ विमानांनी दक्षिण लेबनॉनमध्ये 100 हून अधिक रॉकेट लाँचर्सना लक्ष्य केले. ही रॉकेट लाँचर्स हिजबुल्लाहसाठी महत्त्वपूर्ण होती. सुमारे 100 रॉकेट बॅरेल या कारवाईत नष्ट झाले आहेत. हिजबुल्लाहच्या अनेक इमारती आणि एका शस्त्रास्त्र भांडारावर हल्ला करण्यात आल्याचे इस्रायलच्या सैन्याकडून सांगण्यात आले.
हिजबुल्लाहचे दहशतवादी तळ आणि सैन्य प्रतिष्ठानांना नुकसान पोहोचविण्याची कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे इस्रायलच्या सैन्याकडून सांगण्यात आले. लेबनॉन सीमेनजीक उत्तर इस्रायलच्या अनेक समुदाय आणि शहरांच्या नागरिकांसाठी दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. यात बॉम्ब शेल्टरमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे. आयडीएफने नागरिकांना घरात थांबण्याची सूचना केली आहे. एअर स्ट्राइक हा लेबनॉनकडून मोठ्या प्रमाणात रॉकेट हल्ले झाल्यावर करण्यात आला आहे. इस्रायलने आता हिजबुल्लाहसोबत युद्धाची तयारी केली आहे.
इस्रायली सैनिकांचा मृत्यू
हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोनहल्ल्यात इस्रायली डिफेन्स फोर्सचे दोन सैनिक मृत्युमुखी पडले आहेत. तर 9 सैनिक जखमी झाले आहेत. हिजबुल्लाहचा नेता हसन नसरुल्लाहने गुरुवारी एका भाषणात पेजर अटॅक आणि वॉकी टॉकी स्फोटासाठी इस्रायलला जबाबदार ठरवत सूड उगविण्याची शपथ घेतली आहे. तर इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलेंट यांनी ही धमकी म्हणजे युद्धाचा नवा टप्पा असल्याचे म्हटले आहे. उत्तर इस्रायलमधून विस्थापित झालेले लोक स्वत:च्या घरी परतत नाहीत तोवर लेबनॉनमधील हल्ले सुरू ठेवले जाणार असल्याचे गॅलेंट यांनी नमूद केले आहे.